Ratnagiri News – दापोली-खेड राज्यमहामार्गावर विजेचा खांब बनतोय कर्दनकाळ; फुरूस येथे अपघाताची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतिक्षीत दापोली-खेड राज्यमहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असले, तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरील फुरूस गावाच्या हद्दीत एक विजेचा खांब थेट रस्त्याच्या मधोमध उभा आहे. रुंदीकरण करताना अडथळा ठरणारे अनेक वृक्ष तातडीने तोडणाऱ्या प्रशासनाने, या धोकादायक खांबाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. रस्ता रुंद झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे, अशातच भररस्त्यातील हा खांब मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे.

रस्त्याच्या कामामुळे परिसरात सध्या लाल मातीच्या धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. समोरून येणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या या धुळीमुळे वाहनचालकांना समोरील दृश्य स्पष्ट दिसत नाही. अशा ‘झिरो व्हिजिबिलिटी’च्या स्थितीत रस्त्याच्या मधोमध असलेला हा विजेचा खांब चालकांसाठी जीवघेणा सापळा ठरत आहे. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, महावितरणने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता हा खांब तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.