
एका प्रकरणात तक्रारदाराच्या भावाच्या बाजूने चौकशीचा अहवाल देण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी दीड लाख रुपयांची लाच घेताना खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक तुषार काळे (40) हे ट्रप झाले. ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुन्हे परिषदेत चांगले काम करा, नको ती कामे करू नका, अशा सूचना पोलिसांना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतर सोमवारी खार पोलीस ठाण्याचे सपोनि ट्रप झाले. या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावाने त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भात अति. मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्याकडे फौजदारी खटला दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने प्रकरणात खार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. प्रकरण सहाय्यक निरीक्षक काळे यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. तुषार काळे यांनी चौकशी अहवाल तुमच्या भावाच्या बाजूने देतो असे म्हणत तक्रारदार यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली. पण लाच द्यायची नसल्याने तक्रारदार यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर 16 मार्च रोजी सहाय्यक निरीक्षक तुषार काळे यांना दीड लाख रुपये रोख घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.



























































