
पश्चिम रेल्वेवरील लोकल गाडय़ांना ‘पीक अवर्स’ला होणाऱ्या गर्दीचा ताण कमी होणार आहे. या मार्गावरील 15 डबा लोकल ट्रेनची एकूण संख्या 227पर्यंत वाढणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून 12 डब्यांच्या 16 लोकल फेऱ्यांचे 15 डब्यांच्या फेऱ्यांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान या गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकल फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत होती. मात्र वेळेचे गणित जुळत नसल्याने रेल्वे प्रशासनाने 12 डबा लोकल फेऱ्यांचे 15 डबा लोकल फेऱ्यांमध्ये रुपांतर करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार येत्या 19 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या होणार आहेत.
‘पीक अवर्स’ला 8 फेऱ्या धावणार
15 डबा लोकल फेऱ्यांमुळे ‘पीक अवर्स’ला प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 16 फेऱ्यांपैकी 8 फेऱ्या गर्दीच्या वेळेत चालवण्यात येणार आहेत. या गाडय़ा चर्चगेट ते विरार, भाईंदर, बोरिवली, नालासोपारा तसेच दादर ते बोरिवली दरम्यान धावतील. 15 डब्यांच्या लोकलची प्रवाशी क्षमता 12 डबा लोकलच्या तुलनेत साधारण 25 टक्क्यांनी अधिक आहे.



























































