
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘न्यूट्रीबार’ (प्रोटीन बार) मध्ये काच, खडे आणि प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची धक्कादायक बाब शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी आज हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे उघडकीस आणली. अनेकदा विद्यार्थ्यांना मुदत संपलेले न्यूट्रीबार दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या सुमारे 3 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून ‘न्यूट्रीबार’ दिले जातात. त्यात काचेचे तुकडे, खडे आणि प्लॅस्टिक आढळले आहेत. हा प्रोटीन बार खाऊन एखाद्या विद्यार्थ्यांच्या आतडय़ांना इजा झाली तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल अंकित प्रभू यांनी प्रशासनाला केला. हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा. तसेच कंत्राटदाराच्या फॅक्टरीवर धाड टाकून तिथल्या क्वालिटी कंट्रोलची तपासणी करा, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रशासन विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील नाही. त्यांना विद्यार्थ्यांची काळजी नाही. या सर्व प्रकरणात महापालिका प्रशासनाचे नाव खराब होत आहे. त्यामुळे सर्व संबंधितांवर कारवाई करण्याची सभागृहात मागणी केली आहे. प्रशासनाने उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दा राखीव ठेवला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने 15 दिवसांत अहवाल मागवू. त्यानंतर आयुक्त सभागृहात निवेदन करतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. – अंकित प्रभू, शिवसेना नगरसेवक


























































