
हिंदू नववर्ष स्वागत म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासच्या वतीने श्रीचरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव करण्यात येणार आहे. 19 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत मंदिराच्या आतील परिसरात ही प्रक्रिया पार पडणार असून भक्तांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे व या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.
लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावाच्या दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोन्याच्या अलंकारामध्ये श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठय़ा, साखळ्या व हार यांसारख्या आभूषणांचा समावेश आहे. तर 999 शुद्ध प्रतीच्या चांदीच्या विटादेखील लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमाप्रमाणे होणार असून विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवले आहेत. श्रीसिद्धिविनायकच्या भक्तांनी लिलावात मोठय़ा संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी केले आहे.


























































