महापालिकेत माफियाराज! अडीच हजार रुपयांच्या टँकरची विक्री दहा हजाराला!! भाजपची सत्ता येताच लुटालूट… मुंबईकरांच्या पाण्यावर दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येताच माफियाराज सुरू झाले असून मुंबईकरांच्या पाण्यावर दरोडा टाकण्यात आला आहे. टँकरमाफियांनी पालिकेच्या अधिकाऱयांशी संगनमत करून ऐन उन्हाळ्यात लुटालूट चालवली आहे. अडीच हजार रुपयांत पालिकेकडून पाण्याचा टँकर घेऊन तो दहा हजारांना विकला जात आहे, याबाबत शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सभागृहात रणकंदन झाले.

सभागृहात 66 ब अंतर्गत पाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना शिवसेना सदस्य सचिन पडवळ यांनी टँकरमाफिया आणि पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱयांचे संगनमत असल्याचे नमूद करत गंभीर आरोप केले. काँग्रेस व एमआयएम सदस्यांनीही हा मुद्दा उचलून धरत पाण्याच्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. एसटी प्लांट उभारले जात आहेत. 1200 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. पिण्याव्यतिरिक्त हे पाणी उपलब्ध होईल, परंतु रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे काय झाले, असा सवाल यावेळी शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. 4200 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 600 दशलक्ष लिटर पाणी कमी येत आहे. जागतिक कीर्तीचे शहर म्हणून ओळख आणि पाण्यावर बोलावे लागते. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे अन्यथा भविष्यात वॉटर वॉर होईल, असे सदस्य प्रकाश दरेकर म्हणाले. पाणीचोरी रोखण्यासाठी पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱयांचे निलंबन करा, असे सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले.

पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक होते, मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. पाणी प्रश्नावर वीसहून अधिक सदस्य बोलणार असून अर्ध्या तासाची वेळ असताना 1 तास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे आता गटनेते बोलतील, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अपेक्षित उत्तर मिळालेली नाही, त्यामुळे आढावा घेऊन उत्तर द्यावे, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी यावेळी केली.

टँकर पद्धतीत बदल करणार

टँकरमुळे असुविधेचा सामना करावा लागतो असे दिसत आहे. टँकर पद्धतीत काही बदलत करता येईल का याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येईल, असे यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. लिकेजचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतला जात आहे, असेही ते म्हणाले.

पाणी महागणार का…प्रश्न झोंबला

गेल्या सहा वर्षांत पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. यंदा पाणीपट्टीत वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यावर बोट ठेवत मुंबईचे पाणी महागणार का, अशी विचारणा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मात्र तुमच्या निवेदनाची प्रत सदस्यांना वाटण्यात आलेली नाही, असे कारण देत महापौर रितू तावडे यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले. त्यावरून शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले. प्रथा पाळायची असेल तर सगळय़ाच बाबतीत पाळा, असे पेडणेकर यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा पालिका सभागृहात पडसाद

ऐन उन्हाळय़ात दूषित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वेळेत पाणी येत नाहीत. पाण्याअभावी अनेक सार्वजनिक शौचालये बंद आहेत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. आरेत आदिवासी पाड्यातील लोक आठवड्यातून एकदा आंघोळ करतात, असे एमआयएमचे गटनेते विजय उबाळे म्हणाले.