
विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर झाल्यानंतर आज विधान परिषदेतही हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा देत आपली भूमिका मांडली. तर काँगेस, राष्ट्रवादीने या विधेयकाला विरोध केला. धर्मांतराशी संबंधित गुह्यांसाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता असल्याने या विधेयकाची आवश्यकता असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. या विधेयकावर विधानसभेत दुपारी 2.30 वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत तब्बल सात तास चर्चा झाली.
या विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच जाहीर केले होते. त्यानुसार विधान परिषेदत विधेयक मांडल्यानंतर शिवसेना आणि विरोधक, सत्ताधाऱयांच्या बहुतांशी सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा देत भूमिका मांडली. हे विधेयक आणण्याचा मुख्य उद्देश कोणते, आधीच्या कायद्याच्या तुलनेत नेमके कोणते बदल केले, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे अशी मागणी शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी केली. आमदार सचिन अहीर, सुनील शिंदे यांनीदेखील विधेयकाला पाठिंबा देत या बिलामुळे बेकायदा आणि जबरदस्ती होणाऱया धर्मांतराला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला. मागील काही वर्षांत देशात एका धर्मातून दुसऱया धर्मात बळजबरीने किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर करण्याच्या घटना समोर आल्याने सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी धर्मस्वातंत्र्य अधिनियम लागू केले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026’ नावाने कायदा आणण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे मंत्री म्हणाले. दोन्ही सभागृहांत मंजूर झालेले विधेयक आता राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
भाजप म्हणते भाज्याही भगव्या करून खाऊ!
अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी बिलावर मत मांडताना एक शेर ऐकवला. यानुसार सर्व भाज्याच हिरव्या असल्याने हिंदूंनी केवळ गाजर आणि टमाटरच खायचे का, असेही ते म्हणाले. यावर उत्तर देताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आम्ही हिरवी मिरची, हिरवा पालकच काय तर बकराही भगवा करून खाऊ असे सांगितल्याने सभागृहात एकच हशा पिकला.





























































