भाजप आमदार नरेंद्र मेहता ‘भूमाफिया’, नाना पटोलेंनी उघड केली सरकारी नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता हे सरकारलेखी भूमाफिया ठरले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच शासकीय पत्रामध्ये नरेंद्र मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ केल्याची माहिती काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिल्याने आज विधान भवनात खळबळ उडाली. पटोले यांनी ते पत्रच समोर आणले. मेहता यांनी स्टॅम्प डय़ुटी बुडवल्याचा तसेच मराठी आणि गुजराती नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी आज विधानभवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा मुद्दा मांडला. नरेंद्र मेहता यांनी आदिवासींच्या जमिनीलाटल्याचा आणि सरकारवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बावनकुळेंचे पत्र आपण सभागृहात मांडणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

असे आहे प्रकरण…

नरेंद्र मेहता हे सेव्हन इलेव्हन कंपनीचे मालक आहेत. त्यांनी मीरा रोड परिसरातील कांदळवन क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून सेव्हन इलेव्हन क्लबचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आधीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. नरेंद्र मेहता यांनी शेतकऱयांच्या आणि विशेषतः आदिवासींच्या जमिनी नोंदणीकृत न करता केवळ नाममात्र रकमेवर खरेदी केल्याचेही समोर आल्याने या प्रक्रियेत त्यांनी सरकारची सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांची स्टॅम्प डय़ुटी बुडवून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. वाळू रॉयल्टी घोटाळय़ातही त्यांचे नाव समोर आले. एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची 2.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. मेहता यांच्यावरील आरोपांची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन चौकशीच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाला दिल्याने त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याच संदर्भातील पत्रात बावनकुळेंच्या महसूल विभागाने मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा केला आहे.

मेहतांनी आरोप फेटाळले

आमदार नरेंद्र मेहतांनी हे आरोप फेटाळले आहेत. ‘आमच्या इथे चार-पाच लोक आहेत जे ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. 100 टक्के कुठलेही मुद्रांक शुल्क बाकी नाही, नाना पटोले मोघम आरोप करत आहेत. माझ्या राजकीय शत्रूंनी भूमाफिया असे हेडिंग टाकून हे पत्र मंत्री महोदयांना दिले आणि मंत्री महोदयांनी याची चौकशी करण्यास सांगितले. माझा किंवा माझ्या कंपनीचा कुठलाही स्टॅम्प डय़ुटीचा घोटाळा झालेला नाही,’ असा दावा मेहता यांनी केला.

बावनकुळेंना ‘पोस्टमन’चा राग

‘मंत्री म्हणून काम करताना जेव्हा एखादे निवेदन किंवा तक्रार येते, तेव्हा त्या निवेदनातील विषयाचा संदर्भ घेऊनच पत्र पुढे पाठवावे लागते. तक्रारदाराने जो शब्द वापरला, तोच पत्रात आला आहे. यात कुठेही आमदार असा उल्लेख नाही, फक्त नाव आहे. पटोले हे केवळ राजकारण करत आहेत,’ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पत्रात काय लिहिलेय ते दुरुस्त न करताच पत्र पुढे पाठवायला तुम्ही काय पोस्टमन आहात का, असा सवाल यावेळी पत्रकारांनी बावनकुळे यांना केला असता ते संतापले. मेहता यांच्याविरुद्ध आतापर्यंत 15 तक्रारी आल्या आहेत, त्यापैकी 10-12 प्रकरणांत ते निर्दोष सुटले आहेत. तरीही लोकशाहीत तक्रारीची दखल घेणे मंत्र्यांचे कर्तव्य असल्याने सात दिवसांत चौकशीचे आदेश दिले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.