जनता गॅस सिलिंडरसाठी रांगेत, नरेंद्र मोदी प्रचारात, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातील पवित्र काशीतील गेल्या 35 वर्षापांसून सुरू असलेले अन्नछत्र बंद पडले आहे. देशभरात गॅस टंचाई नाही, असे सरकार सांगत आहे. मात्र, जनता गॅस सिलिंडरसाठी रांगेत आहेत. अमेरिका व चीनची जनता गॅससाठी रांगेत नाहीत. आपल्या देशातील लोक रांगेत आहेत. गॅस सिलिंडरसाठी जनता रांगेत उभी आहे आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारसंभात दंग आहेत, असा घणाघात करत शिवसेनेने आज राज्यसभा दणाणून सोडली.

राज्यसभेत द अप्रोप्रिएशन बिल वरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देशातील भीषण गॅस टंचाईवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पवित्र् काशीमधील 35 वर्षांपासून दिवसाकाठी पंधरा हजार लोकांच्या पोटापाण्याची सोय करणारी अन्नपूर्णा मंदिराची रसोई गॅस टंचाईमुळे बंद पडली आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या प्रसादाच्या दोन लाडूंच्या जागी एक लाडू दिला जात आहे. प्रसादाच्या थाळीतही कपात करण्यात आली आहे. मुंबईत दररोज वीस लाख वडापाव विकले जात होते. मात्र, गॅस टंचाईमुळे ही संख्या अवघ्या पाच लाखांवर आली आहे. हजारो वडापाव गाडीवाल्यांच्या रोजगारावर संक्रांत आली आहे. त्यांना कुटुंब चालविणे कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत सरकार काय करत आहे. तर मायबाप सरकार देशाचे पंतप्रधान प्रचारसभा झोडत आहेत. वास्तविक पंतप्रधानांनी गॅस टंचाईवर सर्वपक्षीय बैठक बोलावायला हवी होती. मात्र, त्यांच्यासाठी प्रचार महत्त्वाचा आहे, असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.

अमेरिका व चीननंतर आपली अर्थव्यवस्था जगात बलाढय़ असल्याच्या थापा सरकार मारत असते. अमेरिका व चीनमध्ये कुठेही जनता गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभी नाही ती आपल्या देशात आहे, याकडे खा. राऊत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रुपया कमकुवत झाला असून महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी शिगेला पोहचली आहे. महाराष्टात कर्ज फेडण्यासाठी 17 शेतकऱयांनी आपली किडनी विकली आहे, असे राऊत यांनी सांगताच सभागृहात शांतता पसरली.

संचित निधी जनतेसाठी की मित्रांसाठी

सरकारला संचित निधीमधन 2.81 लाख कोटी रुपये खर्च करण्यासाठी परवानगी हवी आहे. पण हा पैसा 140 देशवासियांच्या हितासाठी खर्च होणार आहे की पंतप्रधान तो आपल्या लाडक्या उद्योग मित्रांवर खर्च करणार आहेत, याचा हिशेब मागण्याचा जनतेला अधिकार आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी सरकारला बजावले.