
रिक्षात बसण्याच्या वादातून एका अल्पवयीन मुलाने तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुर्ला पूर्वेकडील न्यू रेल्वे कॉलनी परिसरात ही घटना घडली. जयराम नायडू असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
जयराम नायडू हा याच रेल्वे कॉलनी परिसरातील रहिवासी होता. मयत तरुण आणि अल्पवयीन आरोपीमध्ये रिक्षात बसण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. हळूहळू वाद वाढत गेला. यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटला नाही. आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने खिशातील धारदार शस्त्राने नायडूच्या गळ्यावर वार केले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नायडूला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. नेहरु नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन वादातून ही हत्या झाली की पूर्ववैमनस्यातून याबाबत नेहरू नगर पोलीस सखोल चौकशी करत आहेत.





























































