
महेश कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर
आखातात युद्ध पेटले आणि आपल्याकडे स्वयंपाकघरात आदळआपट सुरू झाली. गॅस संपला, आता काय करायचे? असा प्रश्न घराघरातून विचारला जाऊ लागला. गॅस कधी मिळेल, याची शाश्वती नाही. मग काय अनेकांनी मोर्चा वळवला तो स्टोव्हच्या दुकानाकडे ! गेल्या आठवडाभरात शहरातील स्टोव्हच्या दुकानातून तीनशेच्यावर स्टोव्हची विक्री झाली आहे! गंमत म्हणजे गेल्या काही वर्षांपासून स्टोव्हकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्यामुळे दुकानदारांनी हे स्टोव्ह गोदामात ठेवून दिले होते.
तीन दगडाच्या चुलीपासून ते मातीची वैल असलेली चूल नंतर स्टोव्ह आणि आता गॅस, इंडक्शन, ओव्हन असा हा रंजक प्रवास. स्टोव्हचा इतिहासही मनोरंजक आहे. सुरुवातीला उघड्या आगीवर किंवा तीन दगडांच्या चुलीत माणसाने स्वयंपाक केला. मध्ययुगीन काळात युरोपमध्ये चिमणीचा वापर सुरू झाला. याचवेळी मातीचे किंवा धातूचे स्टोव्ह वापरात आले. पुढे अठराव्या शतकात फ्रान्समध्ये ‘स्ट्यू’ आला. याच ‘स्ट्यू’चे पुढे स्टोव्ह असे बारसे झाले. १७४२ मध्ये बेंजामिन फ्रैंकलिन याने स्टोव्हमध्ये सुधारणा केली. १९ व्या शतकात कास्ट आयर्न कुक स्टोव्ह वापरात आले. त्यानंतर २० व्या शतकात स्टोव्हचा वापर कमी होऊन गॅ स, इंडक्शन, ओव्हनचा बोलबाला सुरू झाला.
प्रीमस स्टोव्हचा सुवर्णकाळ स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात औद्योगिकरणाचे वारे वाहू लागले. चूल, शेगडीमुळे होणारा धूर आणि त्यामुळे महिलांना होणाऱ्या श्वसनाच्या आजारांवर पर्याय म्हणून साधारण 1930 पासून भारतात घासलेटवरील स्टोव्हचा वापर सुरू झाला. भारतातील स्टोव्हच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे ‘प्रीमस स्टोव्ह’! सुबक अशी पितळेची टाकी, त्याला घासलेट ओतण्यासाठी झाकण. हवा मारण्याचा पंप, पंपाची पितळी गुंडी, वर भांडे ठेवण्यासाठी जाळी असा या स्टोव्हचा थाट होता. चुलीचा वापर कमी झाला तसा लाकूडफाटा, ढलप्या, गक्ऱ्या, फुकणी हे साहित्यही हळहळ इतिहासजमा झाले.
गॅसटंचाईमुळे स्टोव्हला भाव आला !
हे साहित्य कुठून आणणार?
स्टोव्हचा वापर म्हणजे मोठा प्रपंच. स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा आणि तो बुडवण्यासाठी बिटको काला दंतमंजनची बाटली. या बाटलीत रॉकेल भरून ठेवायचे. स्टोव्हच्या पिना म्हणजे तर जपून ठेवण्याचा ऐवज. स्टोव्हला पिन करणे हेदेखील मोठे कौशल्याचे काम. पिन करताना ती वाकडी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागायची. पिन करताना ती नोजलमध्ये तुटली तर सगळाच खोळंबा. नोजलमधून पिनेची तार काढणे म्हणजे सर्कसच. स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी ५०१ साबणच हवा, साबणाचा तुकडा लावला की थेंबही गळेल तर शपथ, स्टोव्हमध्ये घासलेट भरण्यासाठी नरसाळे हवेच. प्रीमस स्टोव्ह ही त्यावेळी स्वयंपाकघराची शान होती. कुणी याला भणभण्या म्हणे, कुणी भरभऱ्या… स्टोव्ह बंद करताना सोडलेली चावी आणि त्यातून येणारा स्सूऽऽ असा आवाज आणि हळूहळू मंदावत जाणारा जाळ हे सारेच विलक्षण होते. या स्टोव्हने महिलांची चुली फुंकण्यापासून सुटका केली. प्रीमस स्टोव्हमध्येही पुढे संशोधन झाले. डोके भणभणून सोडणारा आवाज बंद करणारे वातीचे स्टोव्ह आले. पण वाती बदलण्याचे काम वाढले. कालांतराने गॅ स आला आणि स्वयंपाकघरातून स्टोव्ह माळ्यावर गेला. माळ्यावरून तो पुढे भंगारात गेला. ओव्हन, इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शनमुळे स्टोव्ह विस्मरणातच गेला.
कामगारांची उपासमार थांबली
रांजणगाव येथे चेतन जोगड यांचे धनश्री स्टील हे दुकान आहे. बाहेरून आलेले कामगार त्यांच्याकडून पाच किलोचा व्यावसायिक गॅस घेतात. आखाती युद्ध सुरू झाले आणि व्यावसायिक गॅसवर निर्बंध आले. सुरुवातीचे चार ते पाच दिवस कामगारांनी हॉटेलचे खाऊन भागवले. परंतु खिशाला परवडत नसल्यामुळे त्यांची उपासमार सुरू झाली. इलेक्ट्रिक शेगडी घरमालक चालवू देत नाही. घरात चूल मांडण्याची सोय नाही अशा कात्रीत सापडलेल्या कामगारांना चेतन जोगड यांनी स्टोव्ह उपलब्ध करून दिले.
आखाती युद्धामुळे गॅसची टंचाई निर्माण झाली आणि विस्मरणात गेलेल्या स्टोव्हला अचानक भाव आला. गेल्या आठवडाभरात कासारीबाजारातल्या अंबिका स्टोव्ह या दुकानातून साधारण शंभर ते दीडशे स्टोव्ह विकले गेले. स्टोव्हची विक्रीच बंद झाल्यामुळे हे स्टोव्ह दुकानमालक सुरेश जैन यांनी गोदामात ठेवले होते. आता वायशर मिळत नाही, पिना मिळत नाहीत, बर्नरही मिळत नाही. स्टोव्हचा वापर करणार कसा, असा प्रश्न सुरेश जैन विचारतात. काही वर्षांपर्यंत वातीचे स्टोव्ह भेळपुरीच्या गाडीवर वापरले जायचे. आता त्यांच्याकडेही गॅस आला आहे. स्टोव्हची विक्री बंद झाली, सुरेश जैन यांनी पर्याय म्हणून मिक्सर, कुकर दुरुस्तीचे काम सुरू केले. पण 1970 पासून असलेले ‘अंबिका स्टोव्ह’ हे दुकानाचे नाव मात्र त्यांनी बदलले नाही.

























































