
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने बुधवारी पहाटे इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीजवळ मोठी लष्करी कारवाई केली. अमेरिकन सैन्याने 5 हजार पाउंड (2,200 किलो) वजनाचे ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब वापरून इराणचे अनेक क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केले आहेत. हे तळ आंतरराष्ट्रीय जहाजांच्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या ‘अँटी-शिप क्रूझ’ क्षेपणास्त्रांचे केंद्र असल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे.
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या या युद्धाला नाटो (NATO) देशांचा पाठिंबा आहे, मात्र हे देश थेट युद्धात उतरण्यास तयार नाहीत. मित्रराष्ट्रांच्या दिलेल्या नकाराला ट्रम्प यांनी मूर्खपणा असल्याचे म्हटले असले तरी, याबद्दल कोणत्याही देशावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिलेले नाहीत. “प्रत्येकजण आमच्याशी सहमत आहे, पण कोणालाही मदत करायची नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतून मालवाहू जहाजांना सुरक्षा देण्यासाठी इतर देशांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या बलाढ्य देशांनी हे आवाहन फेटाळून लावले आहे. जर्मनीने या संघर्षात सक्रिय भाग घेण्यास स्पष्ट नकार दिला, तर परिस्थिती शांत झाल्याशिवाय कोणत्याही युद्धनौका पाठवणार नाही, अशी भूमिका फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतली आहे. मित्रराष्ट्रांच्या या निर्णयामुळे अमेरिकेला या युद्धात सध्या एकटेच लढावे लागत आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जगातील एकूण तेलाच्या पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. हा मार्ग बंद झाल्यामुळे जगभरात इंधनाचे दर प्रचंड वाढले असून आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेले हे हल्ले युद्धाची तीव्रता अधिक वाढवणारे ठरत आहेत.
























































