
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 19 मार्चपासून जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने तुळजा भवानी मातेच्या मंदिराची 70 फूट भव्य प्रतिकृती उभारली असून 27 मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा चैत्र नवरात्रोत्सव पार पडणार असून भक्ती व शक्तीचा जागर होणार आहे.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे होणाऱ्या या चैत्र नवरात्रोत्सवाचे यंदाचे 31 वे वर्ष आहे. गुरुवारी 19 मार्च रोजी देवीचे वाजतगाजत आगमन होणार आहे. सकाळी 10 वाजता कळव्याच्या बाजारपेठेतून देवीच्या आगमन सोहळ्यास सुरुवात होणार असून या मिरवणुकीत तीनशे जणांचे लेझीम पथक सहभागी होणार आहे. त्याशिवाय टाळ-मृदुंगाच्या निनादात वारकरीदेखील येणार असून झांज पथक, बॅण्ड, घोडेस्वार, आदिवासी नृत्य हे प्रमुख आकर्षण राहील.
प्रवेशद्वाराजवळ प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या प्रतिकृती हेदेखील प्रमुख आकर्षण राहणार आहे. नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात संतोष चौधरी (दादुस) यांची कोळी गीते, निवृत्ती महाराज इंदुलकर यांचे कीर्तन, भोजपुरी लोकसंगीत नाईट नीलेश ठक्कर यांचा दांडिया रास, गरबा, भोंडला आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
नवदुर्गा व नवरत्न पुरस्काराचे वितरण
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना नवदुर्गा तर पुरुषांना नवरत्न पुरस्काराने चैत्र नवरात्रोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. या उत्सवात ठाणे शहर व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येतील असा विश्वास शिवसेना नेते राजन विचारे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जाऊन त्यांनी उत्सवाच्या तयारीची पाहणी केली.



























































