गिप्पी ग्रेवाल याला गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिपमुळे पंजाबमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारने त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल झाली, ज्यामध्ये समोरची व्यक्ती गिप्पी ग्रेवाल याला थेट धमकावताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख गोल्डी ब्रार अशी करून दिली असून, त्याने अत्यंत गंभीर भाषेत ग्रेवाल याला इशारा दिला आहे.

या व्हायरल रेकॉर्डिंगमुळे सिनेसृष्टी आणि चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे पडताळली गेलेली नाही, तरीही पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे समजते. यापूर्वीही अनेक पंजाबी कलाकारांना अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या असून, गोल्डी ब्रारचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांशी जोडले गेले आहे. या ताज्या धमकीनंतर गिप्पी ग्रेवाल याच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.