फडणवीसांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी गृह खात्याचा त्याग केला पाहिजे, अहिल्यानगर अ‍ॅसिड प्रकरणी संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीसांचा अर्धा वेळ दिल्लीत जातो, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी लगवला. तसेच फडणवीसांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी गृह खात्याचा त्याग केला पाहिजे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

अहिल्यानगरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीवर अ‍ॅसिड फेकले गेले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, असं काही घडलेलं नाहीये असं देवेंद्र फडणवीस सांगतील. अधिवेशन चालू आहे. ‘असं काहीही घडले नाही. सरकार सक्षम आहे. गृहखात्याचं लक्ष आहे. आमच्या राज्यामध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. विरोधक खोटा प्रचार करत आहेत. ज्या मुलीवर ऍसिड टाकलं गेलं आहे ती मुलगी नसून एक निर्जीव बाहुली होती’ अशी उत्तर तुम्हाला विधानसभेत मिळू शकतात, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच सत्ताधारी नेते भ्रष्टाचार आणि पैशाने आंधळे झाले आहेत . त्यांना राज्यातला अत्याचार दिसत नाहीये, महिलांवरील अत्याचार दिसत नाहीये. त्यांच्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत, त्यांनाही ते दिसणार नाही. एका मुलीवर जर अ‍ॅसिड फेकलं जातंय आणि अशा घटना राज्यात वारंवार घडत असतील, तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात. हे आम्ही वारंवार सांगत आहोत. तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृह खात्याचा त्याग केला पाहिजे. तुमच्याकडे वेळ नाही. तुम्हाला जो वेळ आहे तो फक्त आपल्या राजकीय विरोधकांवर सूडाने कारवाई कशी करता येईल, खोटे गुन्हे कसे टाकता येतील, विरोधकांची कोंडी कशी करता येईल, हेरगिरी कशी करता येईल यात जातोय. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी आहे. देवेंद्र फडणवीसांचा अर्धा वेळ दिल्लीत जातो. त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचाही वेळ दिल्लीत जातो. त्यांना वेळ कुठे आहे? असेही संजय राऊत म्हणाले.