महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा झटका; मारहाण प्रकरणात खटला चालवण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2016 मध्ये शिक्षकांना केलेल्या मारहाण प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा नाकारला. दहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती करीत रितू तावडे यांनी सत्र न्यायालयाचे दार ठोठावले होते. तथापि, न्यायालयाने दोषमुक्त करण्यास स्पष्ट नकार देत महापौरांचा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्यावर मारहाणीच्या प्रकरणात खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पालिका शाळेतील मुख्याध्यापिकेला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षण समितीच्या तत्कालीन अध्यक्षा रितू तावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने त्यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला आहे. 29 जुलै 2016 रोजी वाकोला परिसरातील महापालिकेच्या एका उर्दू माध्यम शाळेत ही घटना घडली होती. शाळेतील एका महिला शिक्षिकेची बदली वांद्रे-कुर्ला संकुल येथील दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. संबंधित शिक्षिका कर्करोगाने ग्रस्त असल्याने तिच्या बदलीला विरोध करण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते.तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 (सरकारी कामात अडथळा), 332 (दुखापत करणे) आणि 504 (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तावडे यांनी त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे आधार असल्याचे स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने दोषमुक्त करण्यास नकार देऊन त्यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयामुळे मारहाण खटल्याची आता नियमित सुनावणी सुरू होणार आहे.

महागडे घड्याळ, वाहनांवरील दिवे अशा विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत नवी भर पडली आहे.