
कौटुंबिक न्यायालयाने मुलांच्या मनातील भीती दूर करणे खूप आवश्यक आहे. यासाठी न्यायालयाच्या पारंपरिक कार्यपद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे. न्यायाधीश आणि वकिलांनी पारंपरिक कोट (गाऊन) घालून कौटुंबिक न्यायालयाच्या कार्यवाहीत सामील होऊ नये, असा सल्ला देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिला.
रोहिणी येथे नव्या कौटुंबिक न्यायालय कॉम्प्लेक्सचा कोनशिला समारंभ सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरन्यायाधीशांनी सांगितले की, जेव्हा आपण कौटुंबिक न्यायालयांसाठी एक नवीन विचार आणि संकल्पना तयार करत आहोत, तेव्हा कौटुंबिक न्यायालयात हे काळे गाऊन (कोट) असावेत का? कौटुंबिक न्यायालयात पीठासीन न्यायाधीश आणि वकील गणवेशात येऊ नयेत.
ते पुढे म्हणाले की, कौटुंबिक न्यायालयात तुमच्या सर्वांसाठी, आमचे पीठासीन अधिकारी न्यायालयाच्या पोशाखात बसणार नाहीत. बारचे सदस्यही काळ्या आणि पांढऱया गाऊनमध्ये येणार नाहीत. ते म्हणाले की, पोलीस अधिकारीही पोलिसांच्या गणवेशात येणार नाहीत, कारण हे संपूर्ण वातावरण मुलांच्या मनात भीती निर्माण करते, विशेषतः जेव्हा ते कोणत्याही व्यवस्थेचे सर्वाधिक बळी ठरतात.



























































