
कॅनडात कारने चिरडून हत्या झालेल्या उज्जैनचा विद्यार्थी गुरकिरत सिंग मनोचा याचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, कॅनडा सरकार मृतदेह देण्यासाठी सुमारे 40 हजार डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) जमा करण्यास सांगत आहे. इतकेच नव्हे, तर तपास प्रक्रियेमुळे रुग्णालयातून मृतदेह 15 दिवसांनीच दिला जाणार आहे. मृतदेह कॅनडातून उज्जैनला आणण्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे.
गुरकिरत सिंगच्या कुटुंबीयांनी आता केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे. गुरकिरतचे वडील गुरजीत सिंग म्हणाले, एवढय़ा मोठय़ा रकमेची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी शक्य नाही. अशा परिस्थितीत सरकारनेच त्यांना मदत करावी.
दोन दिवसांपूर्वी गुरकिरतची कॅनडात कारने चिरडून हत्या करण्यात आली होती. तो सव्वा वर्षांपूर्वी शिक्षणासाठी कॅनडाला गेला होता. तो कोणाच्याही वादात कधी पडायचा नाही. या घटनेने खूप हादरा बसल्याचे वडील गुरजित सिंग यांनी सांगितले.


























































