
>> प्रकाश खाडे
श्रीक्षेत्र जेजुरी परिसरातील देवमळा येथील शेतात सध्या सुगंधी दवणा पूर्णपणे फुलोऱ्यात आला आहे. वाऱ्यासोबत दरवळणारा हा मनमोहक सुगंध केवळ परिसरातच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रात चैत्रमासाच्या आगमनाची आणि हिंदू नववर्षाच्या उत्साहाची चाहूल देत आहे.
जेजुरी परिसरातील दवणा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा भगवान शंकराचा अवतार मानला जातो ,या देवाला भंडार-खोबरे बेल याच्याबरोबरच दवणा अर्पण करतात. हिंदू नववर्ष सुरू झाल्यावर पाडव्यापासून चैत्र मासातील शुक्ल पक्षात विविध देवी – देवतांना सुगंधी दवणा अर्पण करण्याची प्रथा आहे. जेजुरी परिसरातील देव मळ्यामध्ये राहणारे शेतकरी दरवर्षी दवण्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. खंडोबा गडाच्या पायथ्याशी हार फुले घेऊन विक्रीसाठी बसलेल्या महिलांच्या पाट्यांमध्ये सुगंधी दवण्याच्या आकर्षक पेंड्याची पंधरा दिवसापासूनच विक्री सुरू झाली आहे. खंडोबाला आलेले भाविक दवणा खरेदी करीत आहेत. जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव ,लोणावळ्याची एकविरा देवी आदी देवी देवतांना चैत्र मासात दवणा मोठ्या प्रमाणात वाहतात. त्यामुळे त्या परिसरात दवण्याचे उत्पादन घेतले जाते.
चैत्रात गावोगावी भैरवनाथाचे व ग्रामदेवतेचे उरूस सुरू होतात ,यावेळी प्रामुख्याने देवाला दवणा अर्पण करण्याची पद्धत आहे . गुढीपाडव्याला गुढी उभारतानाही दवणा लागतो. जेजुरीपासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देव मळ्यामध्ये माळी समाज बांधव बहुसंख्येने राहतात, सर्वजण खंडोबाचे मानकरी आहेत. गडाच्या पायथ्याशी हार ,फुले ,बेल ,दवणा विकण्याचा यांना मान आहे. प्रामुख्याने मुंबई परिसरातील आगरी ,कोळी समाजातील भाविक मोठ्या प्रमाणात दवणा खरेदी करतात. अनेक कोळी महिला मोराने फुलविलेल्या पिसाऱ्याप्रमाणे दवण्याची वीण करून आपल्या डोक्यामध्ये घालतात. दवणा वाळल्यावर त्याचा सुगंध कायम टिकून राहतो.
दवण्याचे मूळ नाव दमन असून दमन करणे म्हणजे नष्ट करणे याचा अपभ्रम होऊन दवणा शब्द रूढ झाल्याचा इतिहास सांगितला जातो. दवणा नावाचा पूर्वी शिवगण होता. त्याने बेलाप्रमाणे माझा स्वीकार करावा अशी भगवान शंकराकडे प्रार्थना केली ,तेव्हा तू सुगंधी वनस्पतीच्या रूपात जन्म घेशील आणि मी तुला धारण करीन असा वर त्याला मिळाला, त्यामुळे भगवान शंकराला दवणा प्रिय मानला जातो. जेजुरीत तयार होणारा दवणा जेजुरी परिसरात विकला जातोच याशिवाय त्याच्या कोथिंबीर सारख्या पेंड्या बांधून पुणे, मुंबई ,नागपूर आदी भागांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो.
प्रामुख्याने याची लागवड कार्तिक मासात केली जाते व पाडव्याच्या आधी पंधरा दिवस दवणा तयार होतो. झेंडूच्या फुलांप्रमाणेच जेजुरीचा सुगंधी दवणाही सर्वत्र प्रसिद्ध आहे .सध्या दवण्याला मागणी वाढत आहे. पुण्यातील शहरी बाजारपेठेत सणाच्या दिवशी प्रामुख्याने तुळशीबागेच्या परिसरात जेजुरीतील शेतकरी दवण्याची विक्री करताना दिसतात.
जेजुरी परिसरात दवण्यावर प्रक्रिया करणारा उद्योग हवा
देव मळ्याचे पूर्वी नाव दवणे मळा होते. येथील माळी समाज बांधव पिढ्यानपिढ्या दवण्याची लागवड करतात . नफ्यापेक्षा खंडोबाच्या श्रद्धेपोटी येथे दवण्याची लागवड केली जाते . नागनाथ झगडे ,निवृत्ती झगडे ,जयराम झगडे , विलास झगडे यांनी नेहमीप्रमाणे लागवड केली आहे . दवण्याचा उपयोग सण उत्सवाबरोबरच विविध औषधांमध्ये केला जातो. .उर्ध्वपतन पद्धतीने दवण्यापासून उंची अत्तरे ,सेंट ,अगरबत्ती, धूप तयार केले जातात. दवणा हा वात पित्त कफ या त्रिदोषावर गुणकारी मानला जातो .मात्र येथे दवण्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्याने केवळ विक्रीवरच सर्वांना अवलंबून राहावे लागते . या वनस्पती विषयी अधिक ज्ञान शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे असे या शेतकऱ्यांनी सांगितले.
चैत्र शुक्ल पक्षात असा देवांना दवणा अर्पण करावा
चैत्र मासात पाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीला , राम नवमीला ,हनुमान जयंतीला , ग्रामीण भागात होणाऱ्या भैरवनाथाच्या यात्रेला दवणा लागतो . याशिवाय दाते पंचांगामध्ये चैत्र शुक्ल पक्षामध्ये कोणत्या देवांना कधी दवणा कसा अर्पण करावा याची माहिती दिली आहे..
द्वितीयेला शंकर-पार्वतीस, चतुर्थीला गणपतीला , षष्ठीला कार्तिक स्वामींना , सप्तमीला सूर्याला , नवमीला देवीला, द्वादशीला विष्णूला, त्रयोदशीला महादेवाला , तर चतुर्दशीला सर्व देवांना दवणा अर्पण करण्याची पद्धत आहे.


























































