
हिंदुस्थान सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत असून जागतिक ऊर्जा बाजारात मोठे बदल दिसत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील पुरवठ्यात अडथळे, तसेच अमेरिका-इराण युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे हिंदुस्थानने रशियन तेल खरेदी वाढवली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हिंदुस्थान इतक्या मोठ्या प्रमाणावर रशियन कच्चे तेल खरेदी करत आहे की चीनकडे जाणारी काही तेलवाहू जहाजेही मार्ग बदलून हिंदुस्थानकडे येत आहेत. दक्षिण चीन समुद्रात असताना एका जहाजाने चीनऐवजी हिंदुस्थानकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. पुढील काळात चीनसाठी निघालेल्या आणखी अनेक तेलवाहू जहाजांचा मार्ग बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जहाजांच्या हालचालींच्या माहितीनुसार, ‘Aqua Titan’ हे जहाज 21 मार्च रोजी न्यू मंगळुरू बंदर येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजात ‘Urals crude’ प्रकारचे कच्चे तेल असून ते जानेवारीच्या अखेरीस बाल्टिक समुद्रातील बंदरातून लोड करण्यात आले होते. हे Aframax प्रकारातील जहाज यापूर्वी चीनमधील रिझाओ येथे जाणार होते, मात्र मार्चच्या मध्यात दक्षिण-पूर्व आशियाई समुद्रातून जात असताना त्याने मार्ग बदलला.
अमेरिकेकडून हिंदुस्थानला तात्पुरत्या स्वरूपात रशियन तेल आयात वाढवण्याची परवानगी (waiver) मिळाल्यानंतर हा बदल झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे की, आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी कोणाचीही परवानगी आवश्यक नसून त्यांनी रशियन तेल खरेदी कधीच थांबवलेली नाही.
Vortexa Ltd. च्या आकडेवारीनुसार, किमान सात तेलवाहू जहाजांनी प्रवासादरम्यान मार्ग बदलून चीनऐवजी हिंदुस्थानकडे वळण घेतले आहे. सध्या हिंदुस्थानातील सर्व प्रमुख रिफायनऱ्या रशियन तेलाची खरेदी करत आहेत.
हिंदुस्थानने केवळ एका आठवड्यात सुमारे 30 दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले आहे. या घडामोडीनंतर इतर देशांनाही रशियाकडून आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळत आहे. त्यामुळे चीनकडे जाणारे काही मालवाहू तेल कार्गो इतर देशांकडे वळण्याची शक्यता वाढली आहे.
अलीकडच्या काळात रशियन तेलाचा प्रमुख खरेदीदार बनलेल्या चीनला या बदलाचा परिणाम जाणवू शकतो. दरम्यान, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारखे देशही पुन्हा बाजारात सक्रिय होत असून, त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘Zouzou N.’ हे सुएझमॅक्स प्रकारातील जहाज 25 मार्चच्या सुमारास सिक्का बंदर येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजात कझाकस्तानचे CPC Blend प्रकारचे कच्चे तेल आहे. हे जहाज रशियाच्या नोवोरोस्सियस्क बंदरातून निघाले होते आणि सुरुवातीला रिझाओकडे जात होते, मात्र मार्चच्या सुरुवातीला मार्ग बदलून हिंदुस्थानकडे वळले.
या सर्व घडामोडींमुळे हिंदुस्थानने ऊर्जा सुरक्षेसाठी रशियावर अधिक अवलंबून राहण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत असून, त्याचा जागतिक तेल बाजारावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.


























































