Nanded News – देगलूर तालुक्याला पावसाने झोडपले, पिकांचे अतोनात नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्तासह पंचपुरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वार्‍याचा तडाखा बसल्याने रब्बी पिकासह फळबाग, आंबा, टरबूजचे मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वार्‍याचा नांदेड जिल्ह्यात इशारा दिला होता.

१६ तारखेला दुपारी चार-साडेचारच्या दरम्यान देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता परिसराला गारपीटचा मोठा तडाखा बसला आहे. वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात होताच, गारपीटला सुरुवात झाली. गारपीटीमुळे रस्त्यावर व शेतात गारांचा खच पडला होता. मोठं मोठे पडलेल्या गारामुळे टरबुज, आंबा,चिकू, टमाटे व गहू, रब्बी पिकांचे फार मोठे नुकसान झाले.
भर उन्हाळ्यात गेल्या दोन दिवसांपासून माळेगांव परिसरात पावसाळा सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

१६ व १७ तारखेला गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शेतजमीनीतून पाणी वाहून गेले आहे. माळेगांव येथे टरबुजची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. तोडणीला आलेल्या टरबुजाची विक्री शेतकर्‍यांनी १२ हजार टन प्रमाणे व्यापार्‍यांना सौदा केला होता. या गारपिटीने टरबूज उत्पादक शेतकर्‍यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

वादळी वार्‍यामुळे आंबा फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाली. काढणीला आलेल्या गहू, ज्वारीच्या पिकं उध्वस्त झाले आहेत. वार्‍यामुळे गहू, रब्बी पिके भुईसपाट झाली. गारपीटीचा मारा बसल्याने रब्बी पिकांच्या कणसातील दाण्यांची चादरच शेत जमीनीवर पसरल्याचे विदारक दृश्य पाहण्यास मिळाले आहे.

माळेगांव मक्ता परिसराला गारपीटचा तडाखा बसल्याचे वृत्त समजताच देगलूर उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, तहसीलदार भारत सुर्यवंशी यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी १७ मार्च रोजी महसूल व कृषी विभागाच्या पथकाला पंचनामे करण्यासाठी माळेगांव परिसरात पाठवले. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी माळेगांव परिसरात आलेल्या महसूल टीमचे तलाठी नितीन भिसे, तालुका सहाय्यक कृषी अधिकारी एन.जी. वलकले यांच्या टीमने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे.

देगलूर तालुक्यातील माळेगांवसह गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माळेगांवचे माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मोबाईल व्हॉटसॅपव्दारे संपर्क साधून केली.