दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरू करा, अन्यथा कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक; ‘महाराष्ट्र दिनी’ आंदोलनाची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत कोकणवासीयांनी आता थेट कोकण रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देण्याची तयारी केली आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरु करा, अन्यथा ‘महाराष्ट्र दिनी’ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवाशांतर्फे ‘जल फाऊंडेशन’ या संस्थेने दिला आहे.

गेल्या 30 वर्षे कोकणवासीयांच्या सेवेत धावणारी रत्नागिरी पॅसेंजर कोरोना काळात दिवा स्थानकातून चालवण्यात आली. कोरोना महामारी संपल्यानंतर ही गाडी पूर्ववत दादर-रत्नागिरी मार्गावर चालवणे आवश्यक होते. याबाबत प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला. मात्र त्यानंतरही मध्य रेल्वे प्रशासन गाडीला दादर स्थानकात प्लॅटफाॅर्म उपलब्ध नसल्याचे आणि ती वेळ शक्य होत नसल्याचे कारण देत गाडी पूर्ववत सुरु करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याविरोधात कोकणच्या प्रवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. दादर स्थानक मध्यवर्ती ठिकाण असून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सोईस्कर आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिलांना सामान घेऊन दिवा स्थानक गाठणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. असे असताना मध्य रेल्वे प्रशासन जाणूनबुजून ही गाडी पूर्ववत सुरु करत नसल्याचा दावा ‘जल फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन जाधव यांनी केला.

उत्तरेकडील गाड्यांना जागा कशी काय मिळते?

रेल्वे प्रशासन उत्तर हिंदुस्थानला जाणाऱ्या नवीन गाड्यांना दादर स्थानकातील प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन देते, मात्र कोकणच्या गाडीसाठीच जागा नसल्याचे कारण देत आहे. प्रशासनाचा दुजाभाव आता खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. ‘महाराष्ट्र दिना’पूर्वीच गाडी पूर्ववत सुरु करावी, अन्यथा प्रवाशांच्या तीव्र आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीला रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया नितीन जाधव यांनी दिली.

रेल्वे प्रशासनाचा महाराष्ट्रावर अन्याय

कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून प्रवाशांच्या सेवेत धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार तत्काळ सुरु करावी ही आमची आग्रही मागणी आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासन या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. उत्तरेकडील गाड्यांना सोईस्कर वेळ उपलब्ध करुन देणारे रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील जनतेच्या सोईचा विचार करीत नाही ही दुर्देवी बाब आहे, अशी तीव्र नाराजी कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी व्यक्त केली.