ठसा – डॉ. सुनील रामटेके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून आंबेडकरवादी जागतिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत या संस्थेने पाच संमेलने आयोजित केली असून सहावे संमेलन 21 आणि 22 मार्च 2026 रोजी व्हिएतनाम या देशाच्या राजधानीच्या शहरात म्हणजे हनोई येथे संपन्न होत आहे. या जागतिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील रामटेके यांची निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य साहित्य रसिकांना डॉ. रामटेके यांचे नाव ज्ञात असण्याची शक्यता तशी कमीच. याचे कारण म्हणजे डॉ. रामटेके यांचा स्वभाव आणि पिंड, ते मुंबईच्या नाथीबाई, दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात मराठी भाषा व साहित्य विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मुंबईसारख्या नगरीत राहूनसुद्धा डॉ. रामटेके प्रसिद्धीच्या झगमगाटापासून लांब राहिले आहेत. मात्र मराठी साहित्य आणि समीक्षेच्या अभ्यासकांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. एका विद्यापीठाच्या मराठी भाषा व साहित्य विभागाचे प्रमुख ही झाली त्यांची शैक्षणिक ओळख. यापलीकडेही त्यांचे कार्यकर्तृत्व आहे. डॉ. रामटेके संवेदनशील कवी आहेत, साक्षेपी समीक्षक आहेत. प्रतिभावंत नाटककारही आहेत. एक सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आपल्या आजवरच्या दीर्घ साहित्य प्रवासात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर पहिले महानाटय़ लिहिले आहे. या नाटकाचे नाव ‘महासूर्य’. नाटकाचे दिग्दर्शनही त्यांचेच आहे. महाराष्ट्र आणि देशातही त्याचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नाटकासाठी महान अभिनेते आणि विचारवंत दिवंगत डॉ. श्रीराम लागू यांनी आपला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे हे या नाटकाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. जागतिक रंगभूमीवरील आगळ्यावेगळ्या विषयावरचे त्यांचे ‘समांशी’ हे नाटक अतिशय गाजले. सयामी जुळ्या मुलींच्या आयुष्यावर, त्यांच्या भावविश्वावर हे नाटक भाष्य करते. डॉ. सुनील रामटेके यांचा ‘चवदार तळे’ हा कवितासंग्रह 1989 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. याशिवाय ‘सृजनसंदर्भ’, ‘पाश्चात्त्य साहित्य विचारांचा प्रभाव’, ‘आधुनिक मराठी कविता ः आस्वाद आणि चिकित्सा’, ‘लढाऊ स्त्राrची कविता’, ‘दलित साहित्य चर्चा’ हे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा ‘मराठी व्याकरणातील वादस्थळे’ हा अतिशय महत्त्वाचा संशोधन ग्रंथ आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्वत परिषदेवर कुलपती यांचे (राज्यपालांचे) प्रतिनिधी तसेच मुंबई विद्यापीठात संशोधन सल्लागार समितीवरील तज्ञ प्रतिनिधी, अनेक विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावरील तज्ञ सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. रामटेके हे मराठी विषयात एम. ए., एम.फिल., नेट, पीएच.डी. असून त्यांनी ‘मास्टर ऑफ फाईन आर्टस्’ ही पदव्युत्तर पदवीही संपादन केली आहे. एम.ए. मराठीत विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना तीन सुवर्ण पदकेही प्राप्त झाली होती. आंबेडकरवादी नाटय़ चळवळीचा पाया रचण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पथनाटय़ चळवळीतही त्यांनी अतिशय मूलभूत भूमिका बजावली असून ‘बालिका’ आणि ‘मंडल’ ही त्यांची पथनाटय़े गाजली आहेत. आकाशवाणीसाठी नभोनाटय़ांचे लेखनही त्यांनी केले आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी ‘स्मिता पाटील पुरस्कार’, दीपरंग नाट्य पुरस्कार, उत्कृष्ट लेखन पुरस्कार, आचार्य अश्वघोष कलासक्त पुरस्कार, प्रबुद्ध नाटय़ पुरस्कार, महात्मा फुले आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आंबेडकरी रंगकर्मी पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी ‘मराठी नवनाट्यातील हिंसा आणि क्रौर्य’ या विषयावर विद्यापीठ अनुदान मंडळाचा संशोधन प्रकल्पही पूर्ण केला आहे. त्यांना व्याकरणाच्या अभ्यासाकरिता साहित्य अकादमीची फेलोशिपदेखील मिळाली आहे.