
मंत्रतंत्राच्या सहाय्याने महिलांना संमोहित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात हा व्हायग्रा टाकून ओशनो जल बनवून द्यायचा. हे ओशनो जल घेण्यासाठी राजकीय व्यक्तींची रांग लागायची, असा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अशोक खरात हा एक ओशनो जल बनवायचा. एका कफ सिरपमध्ये पाणी टाकायचा आणि त्यामध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा आणि हे ओशनो जल बनवायचा. हे ओशनो जल घेण्यासाठी अनेक राजकारणी त्यांच्या गाडय़ा आणि हेलिकॉप्टर पाठवायचे. त्यामध्ये एक व्यक्ती तर तिरुपती बालाजी मंदिराचा ट्रस्टी असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला.
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल
राज्यातील अनेक राजकारणी भोंदूबाबा कॅप्टन खरातचा सल्ला घ्यायचे. त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, याला महाराष्ट्रची एपस्टीन फाईल म्हणता येईल, असा टोला दमानिया यांनी लगावला.
पांडुरंगाचं दर्शन झालं नाही त्यांनी खरातचं दर्शन घ्यावं चाकणकरांचा व्हिडीओ
आता आषाढी एकादशी झाली. ज्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही त्यांनी खरातचं दर्शन घ्यावं असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं होतं, असं सांगत दमानिया यांनी चाकणकरांचा एक जुना व्हिडीओ समोर आणला. या प्रकरणी चाकणकरांचा राजीनामा का घेतला जात नाही, त्यांना का वाचवलं जात आहे, असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी केला.



























































