नोंद- सिनेमातल्या माणसांबद्दल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

आयुष्य ही एक अजब गोष्ट आहे. आयुष्याचा  कार्यकारणभाव लावता येणं अवघड असतं. मग चित्रपट सृष्टीबद्दल काय सांगावे? इथे सगळंच पराकोटीच्या टोकाचं- यशही आणि अपयशही. अशा या मोहमयी दुनियेतील ज्या काही कलावंतांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं त्यांची ही शब्दचित्रं. सिने पत्रकार मंदार जोशी यांनी ते कलावंत या जगातून निघून गेल्यानंतर जे श्रद्धांजलीपर लेख लिहिले, त्याचा संग्रह ‘जिंदगी कैसी है पहेली हाये…’ या नावाने आला असून तो तारांगण प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.

पुस्तकात दिलीप कुमार, राजेश खन्ना, मनोज कुमार, शशी कपूर, धर्मेंद्र, त्रिदेव म्हणजे चेतन आनंद, देव आनंद, विजय आनंद, ऋषी कपूर या नटांबरोबरच संध्या शांताराम, सुलोचना या अभिनेत्रीचा समावेश आहे. तसंच लता मंगेशकर, भूपेंद्र, एस. पी. बालसुब्रह्मण्यम या गायकांबरोबरच संगीतकार – खय्याम, पंडित शिवकुमार शर्मा, बप्पी लाहिरी, राम-लक्ष्मण या संगीतकारांचा समावेश आहे. तसंच बासू चटर्जी, बी. आर. चोप्रा, यश चोप्रा या दिग्दर्शकांबरोबरच कादर खान, नृत्यदिग्दर्शिका सरोज खान, कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाई आणि मराठी कलावंत श्रीकांत मोघे, प्रदीप पटवर्धन आणि विजय कदम यांचा समावेश आहे. या कलावंतांबद्दल लेखक मंदार जोशी जी अपरिचित माहिती देतात त्यामुळे या पुस्तकाचे वेगळेपण उठून दिसते. देव आनंद कधी दमला नाही की खचला नाही हे कसे? यावर त्याचे उत्तर आहे, ‘एक माणूस या नात्याने अपयशाचा प्रारंभी माझ्याही मनावर परिणाम होतो, परंतु या परिणामाचे माझ्या मनावर फार काळ प्रभुत्व गाजवू देत नाही. नवीन चित्रपटाचे काम सुरू झालं की मी पूर्वीचं अपयश विसरून जातो.’

‘मेरी आवाजही पहचान है’ असं गाणाऱया भूपेंद्रच्या आवाजावर फिदा होऊन गुलजार त्याच्या खास अंदाजात म्हणतात, ‘तुम्हारे आवाज का अगर तावीज बन सकता तो मै जरूर बनाके पहन लेता.’ कादर खान संवाद लेखनाचे 25,000 रुपये घेत असे. पण ‘रोटी’ चित्रपटाचे संवाद ऐकून मनमोहन देसाई इतका फिदा झाला की त्याने कादर खानचे मानधन सव्वा लाख रुपये करून टाकले! तर ‘अमर अकबर अँथनी’मध्ये काम करायला डेट्स नसल्यामुळे धर्मेंद्रने नकार दिला. हे निर्माता मनमोहन देसाईला इतके लागले की त्याने पुधर्मेंद्रला कुठल्याच चित्रपटात घेतले नाही! या संग्रहातील धर्मेंद्र आणि कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाईंवरचे लेख जमलेले आहेत.

 एका गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनाला दहा ते पंधरा हजार घेणाऱया सरोजनी ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दोन तीन..’ गाणं सुपरहिट होताच एका गाण्याचे नृत्य दिग्दर्शन मानधन एक लाख रुपये करून टाकलं! त्याच्याही पलीकडची गोष्ट म्हणजे तेरा वर्षांची निर्मला नागपाल 43 वर्षांच्या बी. सोहनलाल याच्याशी लग्न करते. पण  झालेल्या मुलाला सोहनलाल नाव द्यायला नकार देतो. म्हणून सरोज सोहनलालपासून विभक्त होते… आणि तिच्या दुर्दैवाचे फेरे सुरू होतात. ती केईएम हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते. ग्लास्गो टेलिफोन ऑपरेटर होते… पण या संघर्षाच्या काळात अभिनेत्री साधना आपल्या चित्रपटाची नृत्य दिग्दर्शिका करते आणि परत एकदा चित्रपट सृष्टीत तिचं बस्तान बसतं. तीच सरोज पुसरोज खान होते. सगळंच अविश्वसनीय.

अशीच हकीकत गीतकार योगेशची. ‘आनंद’ चित्रपटातील गाणी लोकप्रिय होऊनसुद्धा त्याला चांगले चित्रपट मिळू शकले नाहीत. असं का याचे उत्तर त्यांनी गाण्यात दिल्याप्रमाणे- ‘जिंदगी कैसी है पहेली हाये…’

 प्रत्येक लेखाला रमेश नावाडकर यांची उत्तम रेखाचित्रे आहेत. त्या चित्रांचे मिळून केलेले मुखपृष्ठदेखील सुरेख आहे.