परीक्षण- समष्टीचे बहुआयामी चित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुधीर शालिनी ब्रह्मे

सुमारे 45 वर्षे निगुतीने काव्यलेखन करणारे शिवा इंगोले यांचा ‘अक्षराचा तिसरा डोळा’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. या कविता म्हणजे दोन दशकांतील सामाजिक अवलोकन, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रगल्भतेतून व्यक्त होणाऱया मर्मग्राही काव्यरूप प्रतिक्रिया आहेत.

इंगोले यांच्या कवितांवर आंबेडकरी विचारांचा प्रभाव असला तरी आंबेडकरी साहित्याच्या अर्थात साठोत्तरी ढसाळ-ढाले-चेंदवणकर आदी पँथर पठडीतल्या कवींच्या किंवा नामांतरोत्तर विद्रोहाच्या प्रभावाखाली त्यांची कविता राहिली नाही. ती वाढत गेली स्वपरिघाबाहेर. त्यातही ग्रामीण भागातून नागर भागात आलेल्या व्यक्तीला भावनिक, मानसिक आणि सामाजिक प्रतलांवर स्थिरावणे अवघड असते. मग ती व्यक्ती स्वतला शोधू लागते. इंगोलेंनीही हा शोध घेतला आहे, पण तो समष्टीच्या व्यापक नजरेतून. म्हणूनच त्यांच्या कवितेत विद्रोहाचे व्यापक आयाम दिसतात.

विद्रोही कवितेच्या प्रवाहाबाहेरची समांतर प्रवाह निर्माण करणारी ही कविता आहे. या कवितेचं विद्रोहाशी नातं आहे तरीही विद्रोहाशी विद्रोह आहे. समष्टीचे सर्वंकष भान असणारी ही कविता आहे. कवी लिहितो ः ‘युद्धानं पेरलाय शांततेचा सुरुंग, विद्रोहाच्या पृष्ठभूमीवर’. ‘विद्रोह’ या कवितेतला विद्रोह संयत तरीही प्रखर आहे. इथे विद्रोह आंबेडकरांची प्रतिमा घेऊन येतो. ‘शिका, संघटित व्हा आणि लढा’ हा बाबासाहेबांचा विचार या विद्रोहाची ठिणगी आहे, एल्गार आहे.

‘अक्षराचा तिसरा डोळा’ वाचनानंतर हा ‘शिवा’चा तिसरा अक्ष असल्याचे जाणवते. हा डोळा भानाचा, ज्ञानाचा आणि आत्मजाणिवेचा आहे. एखाद्या काव्य विषयाकडे पाहत असताना कवी एकाच शीर्षकाच्या एकापेक्षा अधिक कविता लिहितो तेव्हा कदाचित प्रथम लिहिलेल्या कवितात काही सुटलेले दुवे तो दुसऱया कवितेत मांडत असता एकवीस वर्षांच्या कालावधीत आपल्या कवितेतील काव्य विषयाच्या मंथनात कुठेही गाळलेली जागा राहू नये एवढी प्रगल्भता इंगोले यांच्या कवितांत जाणवते.

‘तो’ शीर्षकाच्या पाच कविता, ‘देश’ शीर्षकाच्या चार कविता, ‘मित्रा’, ‘माणूस’ आणि ‘मी’ यांच्या प्रत्येकी दोन कविता या काय दर्शवतात? या कवितांमध्ये ते काव्य विषयाचे विविध आयाम हाताळताना दिसतात. हे आयाम शोधणे म्हणजे त्यांचे सामाजिक अवलोकन, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आहे. त्यांच्या एकूणच संग्रहात चिंतन महत्त्वाचे आहे आणि ते त्याच्या ‘मी’मध्ये दिसते. कवी लिहितो ः ‘मी जात नाही मंदिरात, मी उच्चारीत नाही मंत्र-सूत्ते, मळाचा करीत नाही गणपती/ शंकराच्या जटातून वाहवत जात नाही मी…’ कवीची ही आत्मस्तुती किंवा प्रौढी नाही. अभद्र समष्टीच्या तुलनेत तो हे निरीक्षण मांडतोय.

इंगोले यांची कविता विद्रोहाच्या परिघापल्याड पोचते ती अशा चिंतनगर्भ आशय आणि अभिव्यक्तीमुळे. हा उत्कट चिंतनगर्भतेचा आविष्कार ‘तो’च्या पाच कवितांत आहे. ‘तो’ हे सर्वनाम इथे प्रतिमा बनून येते आणि ‘तो’ या अनाम, अज्ञात व्यक्तिमत्त्वाची ही विविध रूपे एकाच प्रतिमेला विविध आयाम प्रदान करतात.

इंगोले यांच्या शब्दकळेकडे आणि शैलीकडे पाहताना कवीची दुहेरी प्रतिमा (स्प्लिट आयडेंटिटी) जाणवते. त्यांच्या ‘विद्रोह’ कवितेतील ‘पृष्ठभूमी’ हा शब्द विद्रोहाच्या पठडीतला नाही. इंगोलेंच्या कवितेत अनेक संस्कारी शब्द येतात, परंतु ते स्वाभाविक नाहीत. स्वाभाविक नसणारे काही शब्द इंगोले या आंबेडकरी चळवळीतल्या कवीला न्याय देत नाहीत. ‘विद्रोह’ याच कवितेत अशी एक ओळ आहे ः पंचरंगातून वाहतोय ‘धब धब’ सुगंधाचा प्रवाह. विदर्भात ‘धबंधबं’ असा शब्द प्रचलित आहे. मातृभूमी सोडल्यावर मायबोलीशी असलेली कवीची नाळ का तुटते? भाषा बोलींनीच बनते आणि बोली टिकवण्याचे काम कवींचे आहे. ‘तो ः 3’मधील ‘दुग्ध्वती गाईच्या पुनश्च गर्भधारणेची’ या ओळीत संस्कारी शब्दातील उपरोध जाणवतो. इथे ‘दुभत्या’ गाईच्या ‘गाभण राहण्याची’ हे शब्द अधिक कृत्रिम ठरले असते. काही कवितांतील संस्कारी शब्दामुळे आशय कृत्रिम ठरला आहे.

काही अपवाद वगळता अनेक कवितांत आशयाची तात्त्विक मांडणी, सुभाषितवजा तत्त्वज्ञानात्मक शब्दसमूह (वाक्यरचना) लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळेच इंगोले यांची कविता चिंतनगर्भतेच्या वरच्या प्रतलावर पोहोचते. ही काही उदाहरणे पहाः ‘अंधाऱया गुहेत ते शोधताहेत काळे काजवे’. गुहा आणि काळे काजवे या प्रतिमांच्या चपखल वापराने ही ओळ सुभाषितवजा बनली आहे. ‘घर उघडे नागडे झाले की, देशही होतो उघडा नागडा, रस्ते होतात मवाली आणि शहरं भामटे’ किंवा ‘कायदा होतो कुत्र्याचं शेपूट आणि न्याय बैलाची वेसण’. बहुतांश कवितांमधील अशा ओळीतून ‘अक्षराचा तिसरा डोळा’ वाचकाला समाजाचं कॅलिडोस्कोपिक दृश्य दाखवतो.

अक्षराचा तिसरा डोळा

कवी ः शिवा इंगोले

प्रकाशक ः डिंपल प्रकाशन