गाथेच्या शोधात – हरिहरेश्वरचे रहस्यमय मंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विशाल फुटाणे, [email protected]

भीमा आणि सीना नद्यांच्या संगमस्थळी असलेल्या हरिहरेश्वर मंदिरातील 360 मुखी शिवलिंगाची रचना तत्त्वज्ञान, पंथ आणि संस्कृती यांचा संगम दर्शवते. शिवाच्या असंख्य रूपांचे प्रतीकात्मक दर्शन घडवणारे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून तत्त्वज्ञानाच्या अनेक प्रवाहांचे संगमस्थान आहे.

महाराष्ट्रातील हत्तरसंग कुडल हे भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावर वसलेले छोटेसे गाव आहे, परंतु या गावाची ओळख केवळ भौगोलिक नाही, ती आध्यात्मिक, तात्त्विक आणि स्थापत्यवैभवाने समृद्ध आहे. या संगमस्थळी असलेले हरिहरेश्वर मंदिर आणि त्यातील अद्वितीय 360 मुखी शिवलिंग हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय स्थापत्य मानले जाते. शिल्पकला, तांत्रिक परंपरा, कालगणना आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो.

या मंदिरात असलेले शिवलिंग एकाच दगडातून घडवलेले असून त्याच्या मध्यभागी एक मुख्य लिंग आहे आणि त्याभोवती 359 कोरलेली मुखे आहेत. या सर्वांचा मिळून 360 अंशांचा पूर्ण वर्तुळाकार संकल्प तयार होतो. ही संख्या भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली जाते. कारण 360 अंश म्हणजे पूर्णत्व, कालपा आणि ब्रह्मांडीय परिपूर्णतेचे प्रतीक. याच संख्येवर प्राचीन भारतीय कालगणना उभी आहे.

या शिवलिंगाची रचना विशेष लक्षवेधी आहे. त्याचे एकूण नऊ थर असून प्रत्येक थरावर चाळीस मुखे कोरलेली आहेत. प्रत्येक मुख वेगळे आहे. काही शांत, काही उग्र, काही ध्यानमग्न, काही प्रसन्न. मुखमुद्रा, डोळ्यांची रचना, शिरोभूषण आणि भावभावना यात विलक्षण विविधता दिसून येते. या विविधतेतून शिवाच्या असंख्य रूपांचे प्रतीकात्मक दर्शन घडते. जणू जीवनातील प्रत्येक भाव, प्रत्येक अवस्था आणि प्रत्येक अनुभव या लिंगावर कोरलेले आहेत.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे शैव आणि वैष्णव परंपरांचा अद्भुत समन्वय दिसतो. मंदिरात एका गाभाऱयात कालभैरवाची प्रतिमा आहे, तर दुसऱया गाभाऱयात श्रीकृष्णाची वेणुगोपाल मूर्ती आहे. कालभैरव हा कालाचा अधिपती मानला जातो, तर श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या माध्यमातून विश्वरूपाचे तत्त्वज्ञान सांगितले. या दोन शक्तींच्या उपस्थितीत 360 मुखी शिवलिंग जणू विश्वरूप दर्शनाचीच शैव प्रतिकृती वाटते.

भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानाच्या दोन महत्त्वाच्या परंपरा मानल्या जातात आगम आणि गीता. आगमाचे ज्ञान शिवाच्या मुखातून प्रकट झाले असे मानले जाते, तर भगवद्गीतेचे ज्ञान श्रीकृष्णाच्या मुखातून. हत्तरसंग कुडल येथे या दोन्ही ज्ञानपरंपरांचे सहअस्तित्व दिसते. म्हणूनच हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून तत्त्वज्ञानाच्या अनेक प्रवाहांचे संगमस्थान आहे. या परिसराचा ऐतिहासिक संदर्भही तितकाच महत्त्वाचा आहे. येथे प्राचीन काळात कालमुख संप्रदायाचे आचार्य तपश्चर्या करीत होते याचे पुरावे शिलालेखांतून मिळतात. तसेच कल्याणी चालुक्य आणि यादवकालीन शिलालेख या परिसरात सापडतात. यामुळे या स्थळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनेक शतकांपर्यंत पसरलेला असल्याचे दिसते.

या मंदिराचा पुनर्शोधही रोचक आहे. 1974 साली प्रख्यात शिलालेख संशोधक आनंद कुंभार भीमा नदीकाठच्या प्राचीन मंदिरांचा शोध घेत सायकलवरून भ्रमंती करत होते. त्या वेळी संगमेश्वर मंदिराच्या तुळईवर त्यांना मराठी भाषेतील एक प्राचीन शिलालेख सापडला. पुढे या शिलालेखाचा पुरावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महत्त्वाचा ठरला. पुढे 1994 च्या सुमारास सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन भिडे यांनी विद्यार्थ्यांसह येथे शोधकार्य केले. नदीच्या गाळाखाली दबलेले मंदिर खोदकामातून बाहेर आले. त्या वेळी येथे भव्य आयताकृती स्वर्गमंडप, कालभैरवाची मूर्ती, श्रीकृष्णाची वेणुगोपाल प्रतिमा आणि हे अद्वितीय 360 मुखी शिवलिंग सापडले.
या शिवलिंगामागील गणितीय आणि तात्त्विक अर्थ अत्यंत गूढ आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये 360 ही संख्या कालपाशी जोडली जाते. या सर्व संकल्पनांचा विचार केला तर 360 मुखी शिवलिंग जणू काल, कर्म आणि पुनर्जन्म यांच्या पाचे प्रतीक वाटते.

स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनेही हे मंदिर महत्त्वाचे आहे. येथे द्विदल गाभाऱयाची रचना आढळते, जी कर्नाटकातील काही चालुक्यकालीन मंदिरांमध्ये दिसते. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन सांस्कृतिक प्रदेशांच्या स्थापत्यपरंपरांचा संगम येथे दिसतो.

भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावर उभे असलेले हे मंदिर केवळ नदीसंगम नाही, तर तत्त्वज्ञान, पंथ आणि संस्कृती यांचाही संगम आहे. येथे शैव आणि वैष्णव तत्त्वज्ञान एकत्र येते, कालभैरव आणि श्रीकृष्ण यांची ऊर्जा एकत्र जाणवते आणि जीवनातील असंख्य अनुभवांचे प्रतीक असलेली 359 मुखे शेवटी एका केंद्रस्थानी असलेल्या शिवतत्त्वात विलीन होतात. म्हणूनच हत्तरसंग कुडलचे 360 मुखी शिवलिंग हे केवळ एक शिल्प नाही, ते भारतीय तत्त्वज्ञानातील पूर्णत्व, कालपा आणि ब्रह्मांडीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक आहे.