
सत्ताधारी महायुतीत कुरघोडीचं राजकारण विकोपाला गेलं आहे. सत्तेच्या पदांसाठी पोलिसी बळाचा वापर करून हे पक्ष एकमेकांच्या उरावत बसत आहेत. मंत्र्यांमध्ये मारामारीपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेलं आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाली असा आरोप भाजपवर केला आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निशाणा साधला. ‘महाराष्ट्रात रेडय़ाप्रमाणे लोकशाही कापली जातेय हे त्यांच्या आता लक्षात येईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘खरात फाइल्स’वर स्पष्ट भूमिका मांडली. या भोंदूबाबाच्या राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सने संयुक्त सहकार्यातून राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स अभ्यासक्रम शिवसेना भवन येथे सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एपस्टीन फाइल्ससारखं हे प्रकरण आहे. यात अनेक मोठे राजकीय नेते आहेत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, या ‘एपस्टीन फाइल्स’मधून कुणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून महाराष्ट्रात आणखीन काहीतरी नवीन विषय सुरू होऊ नये. मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्राला पुढे नेण्याची इच्छा असेल तर जे जादूटोणाविरोधी कायदा आपण केला त्याचे अत्यंत कठोरतेने पालन झालं पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
खरात फाईल्समध्ये अनेकांची नावे आणि फोटो येताहेत. राज्यातील आणि पेंद्रातील नेतेही त्यात आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता, ‘ज्यांचे काही कर्तृत्व नाही, जे कर्तृत्वशून्य, भाकड आणि भोंदू नेते आणि पुढारी आहेत त्यांनाच अशा भाकडकथा आणि भोंदूगिरीचा आसरा घ्यावा लागतो. ते वेळेत आम्ही सुरू करत असलेल्या कोर्सला आले असते तर त्यांच्यासुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकलो असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कॅप्टन खरातच्या संस्थानासाठी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यावरून प्रश्न विचारला जात आहे, असे पत्रकारांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही सगळ्याची चौकशी करा. माझं काहीच म्हणणं नाही. जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच पाणी कुठेपर्यंत मुरलंय हे कळू द्या. आणि फक्त इतपंच सांगेन ते कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे.’ अधिवेशनात खरात फाईल्सचा मुद्दा विरोधी पक्ष उचलणार का, असे विचारले असता आमचे अनिल परब असतील, सुनील प्रभू असतील, त्याआधी अंबादास दानवे, विलास पोतनीस या सर्वांनी वेळोवेळी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढली. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणंही समोर आणली, पण त्यावरती काहीच झालं नाही. म्हणूनच गेल्या अधिवेशनावेळी मी माध्यमांशी बोलताना, आता पांघरूण मंत्रालय काढलं पाहिजे. सगळ्या पापांवरती पांघरूण घालण्याचं काम ते मंत्रालय करेल आणि ते खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावं, असे म्हणालो होतो, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
लिंबाला टाचण्या मारणारे कोण?
भोंदूबाबा खरातला अटक झाली आहे. रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय असे विचारताच, आपण आता अभ्यासक्रमावर बोलत होतो आणि तुम्ही नेमपं या सगळ्या विषयाचं विरुद्ध टोक गाठलंय. आम्ही जो विषय सुरू करत आहोत तो लॉजिस्टिक्स म्हणजे महाराष्ट्राला विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढे नेणारा आहे आणि तुम्ही परत त्यांच्या लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसा न्यायचा ते लॉजिस्टिक्समध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काही आमचं काम नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ओम फट स्वाहासह सर्वांवर कारवाई करा
‘महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर राजकारणातील त्यांच्या भोंदू भक्तांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. गावोगावी जर का असे कुणी भोंदूबाबा असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्यांना अद्दल घडवा. अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर कारवाई करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्राला आपण आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहोत, असा संतप्त सवालही त्यांनी केला.






















































