
गुवाहाटी ते खरात बाबाचा आश्रम हा महाराष्ट्राचा सध्याचा राजकीय प्रवास आहे. या वाटेवर पुरोगामित्वाची कबर खणून त्यावर अंधश्रद्धेचे झाड लावले गेले आहे. खरात बाबा हा एकटा गुन्हेगार नाही, तर खरात बाबाचे तळवे चाटणारा प्रत्येक जण अपराधी आहे. कष्ट न करता पैशांच्या व कपट कारस्थानांच्या बळावर सत्ताप्राप्ती झाली की, ही असली थेरं सुचतात. उशिरा का होईना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोळ्यांत मिरची यज्ञाचा धूर गेला व त्यांनी डोळे उघडले हे बरे झाले!
फडणवीस मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांना व आमदारांना खान्देशातील बहिणाबाई चौधरी यांचे नाव माहीत नसावे. बहिणाबाई शाळेत गेल्या नाहीत. त्यांनी पुस्तक वाचले नाही, पण जगण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले. निरक्षर असूनही बहिणाबाई कधी श्रद्धा किंवा अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतल्या नाहीत. त्या म्हणतात,
‘नको नको ज्योतिषा,
माझ्या दारी नको येऊ
माझे दैव मला कळे,
माझा हात नको पाहू!’
बहिणाबाई पुढे सांगतात,
‘धनरेषांच्या चऱ्यांनी
तळहात रे फाटला
देवा तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह
तळहाताच्या रेघोट्या
बापा नको मारू थापा
अशा उगा खऱ्या खोट्या’
ज्या महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे आणि बहिणाबाई जन्मास आल्या, त्याच महाराष्ट्रात कॅ. अशोक खरात नावाचा एक ‘राजज्योतिषी’ निर्माण झाला व महाराष्ट्राच्या असंख्य मंत्री आणि राजकीय वतनदारांचा तो कुटुंब सखा, मार्गदर्शक, दिशादर्शक बनला. अशोक खरातला आता त्याच्या
कारनाम्यांबद्दल अटक
झाली. त्याने काय भोंदूगिरी केली हे तपासात सिद्ध होईल. पण ज्योतिष, अघोरी धर्मविधी, भविष्य वगैरेंच्या नावाखाली त्याने अनेक महिलांचे शोषण केले ही बाब भयंकर आहे. आपले भविष्य पाहण्यासाठी व भविष्य घडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातले तालेवार लोक खरातच्या दरबारी हजेरी लावत होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यात आहेत. खरात बुवांचे चरण धुण्याचे काम महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले व त्याच बुवांनी असंख्य महिलांचे जीवन नासवले. पोलिसांनी खरातला आता पकडले, पण देशाचे गृहमंत्री अमित शहांपासून सत्ता पक्षातील कित्येक जण या बुवांचे चाहते होते. ही कारवाई वेळीच झाली असती तर अनेक महिलांची अब्रू वाचली असती. कॅ. अशोक खरात हा गुन्हेगार आहेच, पण त्याचा सल्ला घेणारे, त्याच्या मंदिरात जाऊन पूजाविधी करणारे मंत्री वगैरे लोकही सुटता कामा नयेत. एकट्या रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन प्रकरण दडपता येणार नाही. महाराष्ट्र व एकंदरीत देशातच अंधश्रद्धेचा उथळ खळखळाट सुरू आहे व हे सर्व हिंदुत्वाच्या नावाने चालवले जात आहे. जादूटोणा, तंत्रमंत्र यांना राजमान्यता मिळत आहे. अशोक खरात म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग असल्याचा साक्षात्कार रूपाली चाकणकर यांना झाला व त्यावर आता टीका होत आहे, पण भाजपमधील काही महाभाग पंतप्रधान मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार असल्याचे सांगत फिरतात हा हिंदुत्वाचा अपमान नाही काय? पंतप्रधानांनाच भोंदूबाबा बनविण्याचा हा प्रकार निषेधार्हच आहे. आसाराम बापू हे एकेकाळी भाजप व अनेक राजकारण्यांचे सद्गुरू होते. पंतप्रधान मोदी त्यांच्या चरणी विलीन झाले होते. पुढे त्या आसारामांचे काय झाले हे सगळय़ांनी पाहिले. रामरहीम बाबांचे प्रताप उघड असताना या बाबांना तुरुंगातून वारंवार पॅरोलवर सोडण्याचे प्रताप भाजपवाले करीत आहेत. लोकांना धर्मांधता आणि
अंधश्रद्धेच्या नशेत गुंग
करून ठेवायचे व तेच हिंदुत्व आहे हे मनावर ठासवून राज्य करायचे असे एकंदरीत प्रकार देशात चाललेले दिसतात. त्यामुळे अशोक खरातसारख्यांना व आसामातील बळी दिलेल्या रेड्यांच्या शिंगांना राजकारणात भलतेच महत्त्व आले. मंत्र्यांच्या मनगटावर गंडेदोरे, ताईत सध्या पदकांसारखे लटकलेले दिसतात हे पुरोगामी महाराष्ट्राचे चित्र भयंकर आहे. महाडचे एक मंत्री आपल्या घरात अघोरी पूजा करीत असल्याचे चित्र आणि व्हिडीओ मध्यंतरी समोर आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने तेव्हा काय कारवाई केली? अशोक खरातच्या दरबारात राज्यातील प्रमुख मंत्री पूजाविधी करीत होते व हे विधी म्हणे महाराष्ट्रातील राज्य उलथवून टाकण्यास बळ मिळावे यासाठी केले गेले. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना सांगून खरात बाबाचा ‘कट’ उधळून लावला. स्वतः भाजपचेच लोक या पूजाविधीत सदैव दंग आहेत. त्यामुळे खरे सुसंस्कृत हिंदुत्व अंधारात ढकलले गेले. नशिबाचे नऊ ग्रह किंवा हाताच्या रेषा नशीब ठरवत नाहीत, तर मानवाचे कष्ट त्याचे नशीब ठरवतात. ज्यांनी आत्मविश्वास गमावला ते ज्योतिष व कर्मकांडाच्या मागे लागतात. खरातसारखे ज्योतिषी व त्यांचे राजकीय भगतगण अवकाळी, गारपिटी त्यांच्या तंत्रविद्येवर रोखू शकत नाहीत. पहलगामसारखे अतिरेकी हल्ले रोखून हिंदूंचे प्राण वाचवू शकत नाहीत. बहकलेल्या पंतप्रधानांना सुबुद्धी देऊ शकत नाहीत, पण लोकांना भ्रमात ठेवून, भरकटवून आपले उखळ पांढरे करून घेतात. महाराष्ट्रातले अर्धे मंत्रिमंडळ हे भोंदूगिरीत लीन झाले आहे. गुवाहाटी ते खरात बाबाचा आश्रम हा महाराष्ट्राचा सध्याचा राजकीय प्रवास आहे. या वाटेवर पुरोगामित्वाची कबर खणून त्यावर अंधश्रद्धेचे झाड लावले गेले आहे. खरात बाबा हा एकटा गुन्हेगार नाही, तर खरात बाबाचे तळवे चाटणारा प्रत्येक जण अपराधी आहे. कष्ट न करता पैशांच्या व कपट कारस्थानांच्या बळावर सत्ताप्राप्ती झाली की, ही असली थेरं सुचतात. उशिरा का होईना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोळ्यांत मिरची यज्ञाचा धूर गेला व त्यांनी डोळे उघडले हे बरे झाले!





























































