
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी प्रबोधन शाळेने पुस्तकांच्या माध्यमातून ‘नवविचारांची गुढी’ उभारली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कुर्ल्याच्या प्रबोधन शाळेच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
‘नवविचारांची गुढी’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणे केली. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी गुढी उभारण्यासाठी लागणाऱया घटकांचे महत्त्व सांगितले. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नववर्षानिमित्त संकल्प मांडले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाडव्याचे सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमात पालकांनीही उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी संग्रेस शाळेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र दळवी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्यासह मुख्याध्यापिका विशाखा परब, मुख्याध्यापक संतोष चिकणे, शिक्षिका अंजली कांबळे, शुभांगी मेमाणे, किरण जाधव, अपेक्षा कांबळे, मनीषा लाडे, कर्मचारी महादेव काटे, राजेंद्र तोडकर आदी उपस्थित होते.



























































