2026 मध्येच देशाला मोदी-शहांपासून मुक्ती मिळेल – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून 2026 हे वर्ष पूर्ण करणार नाहीत. मोदी-शहांना आता जावे लागणार आहे. त्यांचे साम्राज्य अस्ताला चालले आहे. मोदींची लोकप्रियता पाताळात गेली आहे. लोक त्यांना शिव्या देत आहेत, असे नमूद करतानाच मोदी-शहांपासून देशाला लवकरच मुक्ती मिळेल, असे विधान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या ‘अनलाईकली पॅराडाईज’ या इंग्रजी आणि ‘नरक में स्वर्ग’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन आज दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब, मावळणकर सभागृह येथे दिमाखदार सोहळय़ात झाले. यावेळी केजरीवाल बोलत होते. मोदींची लोकप्रियता इतकी कमी झाली आहे की जे लाखो ट्रोलर बसवून ठेवलेत त्यांनाही समाजमाध्यमाचे नरेटिव्ह कंट्रोल करता येत नाही, अशी स्थिती आहे. मोदींनी एखादे ट्विट केले तर त्याखाली शिव्या देणाऱया कमेंटचा मारा होतो. मोदींविरोधात कुणी मीम बनवले तर त्याला जेलमध्ये टाकले जायचे, मात्र आता मोदींचे इतके मीम बनताहेत की कुणाकुणाला जेलमध्ये टाकणार, असा सवाल केजरीवाल यांनी केला. मोदी आणि शहांपासून देशाला मुक्ती मिळेल तेव्हा या लढाईत जेलमध्ये जाऊन आम्हीसुद्धा थोडेफार योगदान दिल्याचे समाधान मिळेल. या लढाईचे आम्ही फ्रीडम फायटर आहोत, असे केजरीवाल म्हणाले.

देशातील जनतेने तीन वेळा यांच्या हाती सत्ता दिली. 12 वर्षे हे सत्तेत आहेत. इतका मोठा कालखंड सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा असायला हवा होता. मात्र यांनी इतकी कुकर्मं केलीत की, हा कालखंड सुवर्ण नाही तर काळ्या अक्षरात लिहिला जाईल. यांनी बेइमान आणि इमानदाराची व्याख्या बदलण्याचे काम केले. जो ईडीच्या भीतीने भाजपात जाईल तो बेइमान आणि जो परिणामांची पर्वा न करता जेलमध्ये जाईल तो इमानदार असे सध्याचे चित्र आहे, असे केजरीवाल म्हणाले.

बंगाली जनता मोदी-शहांना पिटाळून लावेल

पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी आहे. हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. गेली 12 वर्षे देशातील जनतेचे शोषण करणाऱ्या मोदी-शहा जोडीचे शोषण करून बंगालची जनता त्यांना सत्तेतून हद्दपार करेल, असा दावा तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला. फेब्रुवारी 2027 मधली उत्तर प्रदेशची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार असून, देशातील मोदी-शहा जोडीची सद्दी त्यानंतर संपेल, असा ठाम विश्वास ओब्रायन यांनी बोलून दाखविला. संजय राऊत निरंकुश सत्तेविरुद्ध लढले. मात्र, त्यांनी शरणागती पत्करली नाही. गंभीर आजाराचा मुकाबला करत असतानाही राऊत लढत आहेत. या लढवय्या वृत्तीला सलाम करण्यासाठी मी इथे आलो आहे, असे ओब्रायन यांनी नमूद केले.

सरकार आम्हाला घाबरले

आम्ही ईडीच्या कारवाईला घाबरू असे सरकारला वाटले होते; मात्र सरकारपुढे आम्ही झुकलो नाही. उलट सरकारच आम्हाला घाबरले, अशी टोलेबाजी आपचे खासदार संजय सिंह यांनी केली. कोणतेही पुरावे नसताना राऊत, केजरीवाल, साकेत गोखले व माझ्यावर ईडीने कारवाई केली. शंभर दिवसांत लोअर कोर्टाने तुरुंगातून सुटका केलेले संजय राऊत हे पहिले व्यक्ती आहेत, असे संजय सिंह म्हणाले. आम्ही मोदींपुढे झुकणारी माणसे नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तृणमूल काँगेसचे राज्यसभेतील मावळते खासदार साकेत गोखले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय जाधव, संजय दीना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, राजाभाऊ वाजे, ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँगेस खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, नीलेश लंके, भास्कर भगरे, तर काँग्रेसचे कल्याण काळे, बळवंत वानखेडे, शिवाजी काळगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संजय राऊतांचा लढा देशाच्या इतिहासात नोंदला जाईल

देशाची लोकशाही संकटात असताना संजय राऊत, अरविंद केजरीवाल ही माणसे लढली. सडक सुनी होती है तो संसद आवारा होती है… हे चित्र देशाने गेल्या बारा वर्षांत पाहिले. मात्र, देशाचा नरक बनविण्याची मानसिकता असलेल्या मोदी सरकारसाठी हे पुस्तक म्हणजेच धडा आहे. संजय राऊतांचा संघर्षाचा लढा हा देशाच्या इतिहासात नोंदला जाईल. ‘अनलाईकली पॅराडाईज’ हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज आहे, अशा शब्दांत 4 पीएमचे मुख्य संपादक संजय शर्मा यांनी राऊत यांच्या पुस्तकाची प्रशंसा केली.

न्यायालये संविधानाचे रक्षण करणार नाहीत तर मग कोण करणार?

संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायसंस्थेची आहे. मात्र, न्यायसंस्थाच निरंकुश सत्तेपुढे शरणागत अवस्थेत आहे मग संविधानाचे रक्षण कोण करणार, असा सवाल करत कपिल सिब्बल यांनी मोदी-शहा यांच्या निरंकुश जुलमी सत्तेविरोधात सर्व विरोधकांनी एकजुटीने आवाज उठविण्याचे आवाहन केले. जगात आपला एकमेव देश असा आहे की, जिथे अटक अगोदर होते मग पुरावे गोळा केले जातात. ही सिस्टम बदलायला हवी, असेही सिब्बल यावेळी म्हणाले.

तुडुंब गर्दी

‘अनलाईकली पॅराडाईज’ पुस्तकाच्या प्रकाशनाला दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती. मावळंकर हॉल हे तसे मोठे सभागृह मानले जाते. मात्र, सभागृहात तुडुंब गर्दी होती. शिवसैनिकांबरोबच दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांचीही या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

जुलमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या सर्वांचा हा संघर्ष – संजय राऊत

‘अनलाईकली पॅराडाईज’ हे पुस्तक माझे एकटय़ाचे नाही. जुलमी सत्तेविरूद्ध लढणाऱ्या सर्वांचा हा संघर्ष आहे. माझ्या मराठीतील पुस्तकाबद्दल बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, हे पुस्तक म्हणजे रडगाणे नाही, तर संघर्षाची गाथा आहे आणि ते खरेच आहे. मंचावर बसलेले लोक हिंमतबाज आहेत, तर मंचापुढचेही लोक तितक्याच हिमतीचे आहेत. ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही निर्दोष राजकीय पैद्याची संघर्षगाथा आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मराठीतील ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर देशपातळीवर हे पुस्तक पोहचवले जावे, अशी मागणी मोठय़ा प्रमाणावर होती. त्यामुळे आज हे पुस्तक हिंदी व इंग्रजीत आले आहे, असे त्यांनी सांगितले. मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आम्हाला तुरुंगात ठेवले. मात्र, मी त्यातून तावूनसुलाखून बाहेर निघालो. तुरुंगात असताना ईडीचे अधिकारी नजरेला नजर मिळवू शकत नव्हते, अशी आठवणही राऊत यांनी सांगितली. मी तुरुंगातून बाहेर आलो तर देशच तुरुंग झाल्यासारखी स्थिती जाणवली. माझा लढा हा लोकशाही वाचविण्यासाठी होता. ईडीची भीती माझ्या तुरुंगवासानंतर जवळपास संपली, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. आज ज्या मावळणकर सभागृहात कार्यक्रम होत आहे ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष हे निष्पक्ष लोकशाहीचे मानदंड होते. आज देशात लोकशाही वाचविण्यासाठी लढावे लागत आहे. त्यासाठी सगळय़ांनीच एकत्र यायला हवे, असे आवाहनही राऊत यांनी केले.

येथे चार जण तुरुंगात जाणारे… एकजण त्यांना बाहेर काढणारे!

पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या मंचावर ईडीच्या वक्रदृष्टीमुळे तुरुंगात जाणारे चार नेते उपस्थित होते. त्याचा उल्लेख संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत केला. इथले माझ्यासकट साकेत गोखले, केजरीवाल व संजयसिंह असे चौघे ईडीच्या राजकीय सूडद्धीच्या कारवाईने तुरुंगात गेलो. मात्र, आम्हा चौघांना बाहेर काढणारेही महनीय व्यक्ती इथे उपस्थित आहेत ते म्हणजे कपिल सिब्बल. राऊतांच्या या फटकेबाजीने मावळणकर सभागृहात हास्याची कारंजी उडाली.

चंबळच्या खोऱ्यातील डापूंच्या टोळीसारखा कारभार – दिग्विजय सिंह

ईडी, सीबीआय आणि आयकर ही केवळ राजकीय शस्त्रे बनली आहेत, असे नमूद करत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मोदी-शहांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. चंबळच्या खोऱ्यात डाकूंच्या टोळीत सामील व्हायचे असेल तर कुणाला तरी ठार मारावे लागायचे. तसेच आज चालले आहे. तुम्ही भ्रष्टाचार करा मग तुम्ही त्यांच्या पार्टनर यादीत सामील होता. आणि एकदा तुम्ही त्यांच्यात सामील झाला की तुम्हाला कुणी हात लावू शकत नाही. ‘खाओ, खिलाओ और सामील हो जाओ’ हेच ’गुजरात गव्हर्नन्स’ आहे, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

कसाबची बिर्याणी… हे पाप आमचेच

आर्थर रोड तुरुंगात कुख्यात कसाबला बिर्याणी खाऊ घातल्याची खोटी कथा ज्यांनी रचली तेच महाशय आज राज्यसभेत आमच्या शेजारी येऊन बसले आहेत. संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात या खोटारडेपणाचा खरपूस समाचार घेतला आहे. मात्र, कसाबची बिर्याणीची फेक स्टोरी पसरवणाऱ्या व्य्कतीला आमच्याच सरकारने विशेष सरकारी वकील नेमले होते. हे पाप आमचेच, अशा शब्दांत दिग्विजयसिंह यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या चुकीची जाहीर कबुली दिली.

हे शिवसेनाप्रमुखांप्रति समर्पण

संजय राऊत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडले. संघर्षमय लढय़ातून आकाराला आलेले राऊतांचे पुस्तक म्हणजे शिवसेनाप्रमुखांप्रति त्यांचे असलेले समर्पण आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ‘अनलाईकली पॅराडाईज’ या पुस्तकाचे काैतुक केले. संजय राऊत, केजरीवाल, संजयसिंग हे आजच्या पिढीतले स्वातंत्र्यसैनिक आहेत, अशी प्रशस्तीही त्यांनी दिली.

सरकार जे सांगेल ते करणे एवढेच काम ईडीला उरलेय – सिब्बल

ईडीला ‘एन्पर्ह्समेंट नव्हे एन्डॉर्समेंट डिरेक्टोरेट’ म्हटले पाहिजे. सक्तवसुली संचालनालय समर्थन संचालनालय झाले आहे. सरकार जे सांगेल ते करणे एवढेच काम ईडीला उरले आहे, अशी टीका कपिल सिब्बल यांनी केली. ईडीने केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच कसे लक्ष्य केले याची तपशीलवार माहिती संजय राऊत यांच्या पुस्तकात आहे. त्यावर बोट ठेवत सत्ताधाऱयांमध्ये कुणीच दोषी नाही का, असा सवाल त्यांनी केला. सर्व विरोधी पक्षांनी यावर सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली पाहिजे, असे सिब्बल म्हणाले.