LPG Shortage खानावळी बंद; मुंबईचा डबेवाला संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धाचा तडाखा आता मुंबईच्या सर्वसामान्यांना बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवडय़ामुळे मुंबईतील अनेक नामांकित हॉटेल्स आणि खानावळी तात्पुरत्या स्वरूपात बंद पडल्या आहेत. याचा मोठा फटका मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱया डबेवाल्यांना बसला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचे 30 टक्के ग्राहक हे खानावळीच्या जेवणावर अवलंबून आहेत, मात्र खानावळी बंद असल्याने त्याचा परिणाम थेट डबेवाल्यांवर झाला आहे. त्यामुळे मुंबईचा डबेवाला संकटात सापडला असून उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे.

मुंबईकरांना दुपारचे गरमागरम जेवण अगदी वेळेवर पोहोचवणारी एकमेव संस्था म्हणजे डबेवाले. दीडशे वर्षांपासून सुरू असलेल्या या संघटनेत तब्बल पंधराशे डबेवाले असून ते दररोज 80 हजार ग्राहकांपर्यंत डबे पोहचवण्याचे काम करतात. यात 70 टक्के घरगुती जेवण आणि 30 टक्के खानावळ (मेस)च्या डब्यांचा समावेश आहे. मात्र युद्धामुळे हिंदुस्थानात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा फटका थेट हॉटेल व्यवसायिकांवर झाला आहे. अनेक तात्पुरत्या स्वरूपात हॉटेल आणि खानावळ तर बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी डबेवाले आणि त्यांच्या ग्राहकांवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. अनेक खानावळी बंद झाल्याने 10 ते 15 टक्के ग्राहकांचे डबे बंद झाले आहेत, तर घरगुती डब्यांमध्येही पाच टक्क्यांची घट झाली आहे. त्याचा थेट धंद्यावर परिणाम झाला असून 20 -22 हजार मिळणार पगार 10 ते 12 हजारांवर येण्याची भीती डबेवाल्यांचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी व्यक्त केली आहे.

गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे खानावळीमध्ये अंदाजे 15 आणि घरगुती डब्यामध्ये 5 टक्क्यांनी घट झाली आहे. युद्ध असेच सुरू राहिले तर परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते. – किरण गवांदे, सरचिटणीस, मुंबईचा डबेवाला

डबेवाल्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे. मात्र युद्धामुळे मेस बंद झाल्या. कामगारांसाठी लागणारे जेवण डबेवाल्यांमार्फत खानावळींमधून मागवत होते. मात्र आता ते बंद झाल्याने या कामगारांच्या जेवणाची सोय अन्य ठिकाणांवरून करावी लागत आहे. मात्र हे जागतिक संकट असल्याने ते एवढय़ा लवकर संपणार नाही आणि पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात अशी भीती आहे. – केतन खिरणी, व्यावसायिक