
अल्पवयीन मुलांकडून मोबाईल फोनचा वापर होण्याचे प्रमाण आणि दुष्परिणाम वाढल्याने मोबाईल वापरावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र कायदा बनवला जाईल. यासंदर्भात टास्क फोर्स नेमण्यात आला असून त्याच्या अहवालानंतरच हा कायदा किंवा धोरण केले जाईल, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी आज विधानसभेत सांगितले.
आमदार राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱया परिणामांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. लहान मुलांकडून मोबाईलचा वापर वाढल्याने 13 ते 16 वयोगटातील प्रत्येक 3 पैकी 1 मुल ऑनलाईन छळाचे बळी ठरत आहे. 47 टक्के मुले रोज 3 तासांपेक्षा जास्त मोबाईल वापरतात. 30 ते 40 टक्के मुले मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यातही झपाटय़ाने वाढ होत आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले. हे रोखण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल सेफ्टी विषय शिकवा, प्रत्येक जिह्यात सायबर सेल स्थापन करा, ज्या अॅपमुळे जास्त परिणाम होतो त्यावर बंदी आणा, पालकांच्या परवानगीशिवाय मोबाईलचा वापर करता येणार नाही असा नियम आणा अशी मागणी त्यांनी केली.



























































