कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अमली पदार्थांच्या अड्डय़ांवर कारवाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रुझ येथील यशवंत नगर व वाकोला परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱयांच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी गस्त घालून दहशत निर्माण केली आणि अमली पदार्थांच्या अड्डय़ांना आळा बसला. पण न्यू मिल रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अमली पदार्थ्यांच्या अड्डय़ांवर कधी कारवाई करणार, असा सवाल शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी आज केला. त्यावर या मैदानातील अमली पदार्थांच्या अड्डय़ांच्या विरोधात त्वरीत कारवाई करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

सांताक्रुझ येथील यशवंत नगर व वाकोला येथील फॉर्च्युन हाईट गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोरील पब्लिका विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सिगारेट, चरस, गांजाचे सेवन करून या भागातील रहिवाशांना अर्वाच्य शिवीगाळ करीत होते. त्याविरोधात वाकोला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीच्या संदर्भात संजय पोतनीस यांनी प्रश्न विचारला होता. ही तक्रार दाखल झाल्यावर आठ दिवस पोलिसांनी गस्त घालून दहशत निर्माण केली. पोलिसांनी गस्त घातल्यावर अमली पदार्थांचे सेवन करणाऱयांना व अड्डय़ांना आळा बसला. त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी वाकोला पोलिसांचे आभार मानले आहेत. पण कुर्ला पश्चिम न्यू मिल रोडला छत्रपती शिवाजी मैदानात सामान्य लोक आत जाण्यासाठी घाबरतात. या मैदानात फिरण्याऐवजी अमली पदार्थांचे सेवन होते. याला आळा घालणार काय? संपूर्ण वाकोला परिसरातील जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी कारवाई करणार का, असा सवाल संजय पोतनीस यांनी केला. त्यावरील उत्तरात योगेश कदम यांनी त्वरीत कारवाईचे आदेश दिले. ड्रग्जचा पुरवठा करणाऱयांवर यापुढे मकोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले.