पर्यावरण व वातावरणीय बदल समितीची स्थापना गरजेची, सुनील प्रभू यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरे विकसित होत असताना हवेचा दर्जा खालावत आहे. परिणामी श्वसनाचे आजार बळावत आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांना स्थगिती देणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी एक एसओपी तयार करण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेत पर्यावरणविषयक योजना राबवण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल समिती स्थापन करण्याची गरज आहे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली.

मुंबईसह इतर शहरांमध्ये प्रदूषण वाढत आहे. अवकाळी पाऊस, वाढती उष्णता यामुळे वातावरणात बदल होत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणाचा केवळ मुंबईला नव्हे, तर राज्यांतल्या इतर शहरांनाही त्रास होत आहे. प्रदूषणावर ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना वेगवेगळय़ा आजारांना सामोरे जावे लागते. श्वसनाच्या रुग्णांची संख्या या शहरात झपाटय़ाने वाढत आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांचा झपाटय़ाने विकास होत आहे. त्याच्याकडे आपण विकास म्हणून बघतो; पण प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक ‘एसओपी’ तयार केली पाहिजे. या माध्यमातून आपण प्रदूषणावर नियंत्रण आणू शकू, असा विश्वास यावेळी सुनील प्रभू यांनी व्यक्त केला

मुंबईतील विकासकामांना महापालिकेने स्थगिती दिली. त्यामुळे एक्यूआय म्हणजे हवेच्या दर्जाच्या निर्देशांकात घट दिसून येते. पण मुंबई व इतर शहरांमध्ये विकासकामांना स्थगिती देणे हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी ठोस कार्यवाहीची गरज आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीही कधी त्वेषाने बोलत नाहीत

विरोधी पक्ष भरकटलेला आहे अशी टीका सत्ताधारी पक्षाच्या सदस्याने सभागृहात केली होती. त्या वक्तव्याचा सुनील प्रभू यांनी समाचार घेतला. आज तुम्ही सत्ताधारी बाकावर आणि आम्ही विरोधी बाकावर बसलो आहोत. पण उद्या सत्ताधारी पक्षाचे लोक विरोधी बाकावर बसतील. सत्ताधारी पक्षाचे सदस्य विरोधकांशी त्वेषाने बोलत होते हे दुर्दैव आहे. पण मुख्यमंत्रीही विरोधकांशी कधी इतक्या त्वेषाने बोलत नाहीत याची जाणीव सुनील प्रभू यांनी सत्ताधारी सदस्यांना यावेळी करून दिली.