
सांगली जिह्यात उन्हाचा पारा चढत असून, फेब्रुवारीमध्ये 83 प्रकल्पांत 63 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मार्च महिन्याच्या मध्यावर म्हणजे एका महिन्यात 1232 दशलक्ष घनफूट म्हणजे 17 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या प्रकल्पात 46 टक्के इतका पाणीसाठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असल्याने जिह्यात पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
जलसंपदा विभागाकडे पाच मध्यम, तर 78 लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता 9353 दशलक्ष घनफूट असून, त्यापैकी 7775 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. फेब्रुवारी महिन्यात 83 प्रकल्पांत 63 टक्के म्हणजे 4888 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, गेल्या महिन्याभरात उष्णताही वाढली आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पानातून उपसाही वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे.
मार्च महिन्याच्या मध्यावर या प्रकल्पात 5211 दशलक्ष घनफूट इतका एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी 3656 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. अर्थात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत उपयुक्त पाणीसाठा 1232 दशलक्ष घनफूटने घटला आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्यातील प्रकल्पांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. 83 प्रकल्पांपैकी एकच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे, तर 25 ते 50 टक्के पाणीसाठा असणाऱया प्रकल्पांची संख्या 34 इतकी आहे.
गतवर्षी याच महिन्यात या प्रकल्पात 2963 दशलक्ष घनफूट म्हणजे 38 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च महिन्यात 693 दशलक्ष घनफूट म्हणजे 8 टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के जरी पाणीसाठा जास्तीचा असला तरी, मार्चच्या मध्यापासून पाणीटंचाईची झळ सुरू झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.
सिंचन योजना सुरू असूनही पाणीसाठा कमीच!
ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांचे आवर्तन गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून सुरू आहे. या योजनेतून लाभक्षेत्राच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी दिले आहे; परंतु या योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव भरण्यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजनच केले नसल्याचे चित्र आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेतून 145 तलाव भरल्याचा दावा संबंधित अधिकाऱयांनी केला आहे. मग ताकारी योजनेचे पाणी कोणत्या तलावात भरले, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जिह्यातील तीनही योजना सुरू असूनही पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात पाणीसाठा कमी कसा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
तालुकानिहाय पाणीसाठा
तालुका प्रकल्प पाणीसाठा टक्के
तासगाव 7 224.79 40
खानापूर 8 316.38 58
कडेगाव 7 272.95 43
शिराळा 5 426.72 48
आटपाडी 13 676.24 58
जत 27 1196.66 40
क.महांकाळ 4 68.93 56
मिरज 3 62.88 52
वाळवा 2 10.77 22
एकूण 83 36.53 47






























































