
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. 2026- 2031 या कालावधीतील संचालक मंडळावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून शहापूर तालुक्यातील 68 सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे. एकूणच जिल्ह्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या बँकेवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी राजकीय चुरस वाढू लागली आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी पत्र काढून जिल्ह्यातील सर्व सभासद संस्थांकडून प्रतिनिधी निवडीचे ठराव मागवले आहेत. यासंदर्भात तालुक्यातील सहकारी संस्थांचे ठराव स्वीकारण्याचे अधिकार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शहापूर, दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि THE THANE DISTRICT CENTRAL CO-OP BANK LTO TRAN
जि. ठाणे यांना देण्यात आले आहेत. संबंधित संस्थांनी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतिनिधी निश्चित करून त्यांचे ठराव व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. संस्थांनी प्रतिनिधी ठरावासोबत प्रमाणपत्राच्या चार प्रती, संचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त, बैठकीसाठी दिलेली नोटीस आणि उपस्थित संचालकांचा हजेरीपट यांच्या प्रत्येकी चार प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
थकीत संस्था मतदानास अपात्र
कृषी पतपुरवठा सहकारी संस्था वगळता इतर सभासद संस्था थकीत असल्यास त्या संस्था मतदानास पात्र असणार नाहीत. निवडणूक नियमाचे कलम 10 (4) नुसार एकदा पाठवलेल्या प्रतिनिधीचा ठराव बदलता येणार नाही. परंतु प्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास अथवा संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ गठीत झाल्यासच ठरावात बदल करून सुचवता येईल.
सर्व कागदपत्रे 6 मार्च 2026 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शहापूर यांच्या कार्यालयात जमा करावीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधी पदासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या असून ठरावावर आपले नाव निश्चित व्हावे यासाठी राजकीय स्तरावर लॉबिंग सुरू झाले आहे.





























































