दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, नेपाळमार्गे येणारा पाकिस्तानी शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; 10 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचे धागेदोरे पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पसरले असून पोलिसांनी एकूण 10 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान आरोपींकडून 21 अत्याधुनिक विदेशी बनावटीची शस्त्रे आणि 200 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये विशेष दलाद्वारे वापरल्या जाणाऱ्या ‘PX-5.7’ या घातक पिस्तुलसह झेक प्रजासत्ताक, इटली आणि जर्मनीमध्ये तयार झालेल्या हाय-एंड शस्त्रांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व शस्त्रे पाकिस्तानातून तस्करी करून हिंदुस्थान-नेपाळ सीमेमार्गे देशात आणली गेली होती. दिल्लीतील ‘वॉल सिटी’ परिसरातून या टोळीचे कामकाज चालवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, जप्त केलेली ही शस्त्रे दिल्ली-एनसीआर आणि इतर राज्यांतील कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांना पुरवली जाणार होती. या शस्त्रांचा वापर एखाद्या मोठ्या गुन्ह्यासाठी किंवा दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये झेक प्रजासत्ताकची सब-मशीन गन, इटलीची बेरेटा, जर्मनीची वाल्थर, ब्राझीलची टॉरस आणि तुर्कीची स्टोएगर यांसारख्या महागातल्या सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलचा समावेश आहे. यातील ‘PX-5.7’ पिस्तुल अत्यंत दुर्मिळ मानले जाते, जे जगभरातील केवळ विशेष सुरक्षा दलेच वापरतात. इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक विदेशी शस्त्रे पकडली गेल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.