
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी भाजप व मिंधे गटात राडा झाला होता. यावेळी जिल्हा परिषदेत पोलिसांनी मंत्री शंभूराज देसाई यांना मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर विधानभवनातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. या घटनेवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप व मिंधे गटावर टीका केली आहे.
”पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव टाकून महाराष्ट्रात गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात आहे. जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर आहे ते मंत्रीच जर पोलिसांनी आम्हाला मारलं असं सांगत असतील, मंत्र्यांच्या कॉलरला हात घातला जात असेल तर याचा जनतेवर काय परिणाम होईल ? सरकारमधील पक्षांमध्ये सुरू असलेल्या या गँगवॉरने महाराष्ट्राला बदनाम केले आहे. या मंत्र्यांमध्ये थोडासा स्वाभिमान असता तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असता. पण सत्तेसमोर सगळेच लाचार आहेत”, असे वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी त्यांनी साताऱ्यातील प्रकार निंदनीय असल्याचे देखील म्हटले, ”अंतरवली सराटी येथे आंदोलकांवर, महिलांवर लाठी चार्ज करणारा व साताऱ्यात मंत्र्यांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी एकच आहे, पण त्या अधिकाऱ्याच्या चुकांवर सतत पांघरून घातले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीत, साताऱ्यात झालेला हा हिंस्र प्रकार अतिशय निंदनीय आहे”, असे ते म्हणाले


























































