
भातसा, तानसा आणि मोडकसागर ही तीन मोठी धरणे शहापूर तालुक्यात असतानाही स्थानिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशीच अवस्था तालुक्याची आहे. शहापूर तालुक्याच्या दुर्गम व टंचाईग्रस्त भागातून जानेवारीपासूनच टँकरची मागणी सुरू झाली असून आजमितीस ५१ गावपाड्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्याला गेल्या पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १७कोटी खर्च झाले असून रडतखडत सुरू असलेली भावली पाणी योजना आणि निधी अभावी लटकलेल्या जलजीवन मिशन योजनेमुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. नदी, नाले, विहिरी, बोअरवेलसारखे जलस्रोत आटल्याने दुर्गम भागातील महिलांना मैलोन्मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. पाणीयोजना दुरुस्ती, बोअरवेल, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा टंचाई आराखडा तयार होतो. यंदाही १३ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. मात्र पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होताना दिसत आहे.
- साडेतीनशे कोटींची भावली पाणी योजना अर्धवट असून जलजीवन मिशनच्या योजना निधीअभावी रखडल्या आहेत.
- तालुक्यात साठ हजारहून अधिक गाय, बैल, म्हैस, शेळ्या अशी जनावरे असून पाण्याअभावी जनावरांचे हाल सुरू आहे.
‘हर घर नल’ कागदावरच
जलजीवन मिशनच्या योजना निधीअभावी रखडल्या आहेत. त्यामुळे ‘हर घर नल से जल’ ही घोषणा केवळ कागदावरच उरली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने गावांतील उपलब्ध पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.
आमच्याकडे शेती आहे, जनावरं आहेत पण पाणी नाही. टँकरचं पाणी पिण्यासाठीच पुरतं, जनावरांना देणंही कठीण झालंय. धरणं डोळ्यांसमोर आहेत, पण आमच्या शेताला पाणी मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
सखाराम वारे, शेतकरी
14 टँकर दाखल
शहापूर तालुक्यातील कोथळे, पारधवाडी, लादेवाडी, उंबरखांड, कळभोंडे, कोळीपाडा, पाटोळपाडा, फुगाळे, उठावा, घाणेपाडा आदी ५१ गावपाड्यांवर १४ टँकर सुरू असून लाहे, वरस्कोळ, कळमगाव, तलवाडा, धामणी, साकडबाव, अजनुप या भागांसाठी दहा टँकरची मागणी प्रस्तावित केली आहे.






























































