
IPL 2026 चा धुरळा सुरू झाला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सने विजयी सुरुवात केली असं विरोधी संघांना धोबीपछाड केलं आहे. काल (29 मार्च 2026) मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुनील नरेय यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सुनील नरेन आता आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. या विक्रमासह त्याने कीरॉन पोलार्डचा 189 सामन्यांचा विक्रम मोडीत काढला असून, आता नरेनच्या नावावर 190 आयपीएल सामन्यांची नोंद झाली आहे.
सुनील नरेन हा आयपीएलच्या इतिहासातील अशा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे, जो 2012 मध्ये पदार्पण केल्यापासून आजपर्यंत (2026) केवळ एकाच कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत आहे. नरेनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 187 डावांत 192 बळी टिपले असून त्याची 6.79 ची इकॉनॉमी अत्यंत प्रभावी राहिली आहे. केवळ गोलंदाजीच नव्हे, तर फलंदाजीमध्येही त्याने 166.51 च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटने 1780 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
नरेनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने वेस्ट इंडिजसाठी 6 कसोटी, 65 एकदिवसीय आणि 51 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 21, वनडेत 92 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 52 बळी त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमधील परदेशी खेळाडूंच्या सर्वाधिक सामन्यांच्या यादीत आता नरेन (190) अव्वल स्थानी असून त्याखालोखाल कीरॉन पोलार्ड (189), एबी डिव्हिलियर्स (184), डेव्हिड वॉर्नर (184) आणि ड्वेन ब्राव्हो (161) यांचा क्रमांक लागतो.


























































