
>> दुर्गेश आखाडे
हॅलो, मी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून बोलतोय. तुमची कर्जाची अमूक-अमूक रक्कम थकीत आहे? ती कधी भरणार? रक्कम कशी भरणार? रोख…धनादेश की नेटबॅंकिंगने. अशा एआय कॉलच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने थकीत कर्जदारांशी संपर्क सुरू करून वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एआय कॉलमुळे आता थकीत कर्जदार आणि वसुली अधिकारी यांच्यात फोनवर होणारा संघर्ष टळणार आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने यंदा प्रायोगिक तत्त्वावर हा एआय कॉलचा उपयोग केला आहे.अनेकवेळा वसुली विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वच थकबाकीदारांना वेळेत संपर्क करणे शक्य होत नाही. वसुली अधिकाऱ्यांने थकबाकीदाराला वसुलीसाठी फोन केला की त्याचे रूपांतर वादात होते. वादाला कंटाळून काही कर्मचारी माघार घेत असतात त्याचापरिणाम मार्च अखेरीला बॅंकेच्या ताळेबंदावर पडतो.काही वेळा कर्जधारकाच्या विसरभोळेपणामुळे हफ्ता भरायचा राहून जातो अशावेळी एआय कॉल उपयोगी ठरत आहे.
दोन्ही बाजूनी संवाद…
पूर्वी रेकॉर्ड केलेला कॉल हा एकतर्फी संवाद साधायचा. म्हणजे फक्त फोनवर समोरून माहिती मिळायची त्यामुळे ज्याला फोन केलाय त्याला काहीच उत्तर देता येत नव्हते किंवा मोबाईलवर हफ्ता भरण्याबाबत मेसेज आला तरी त्याला रिप्लाय करता येत नव्हता. एआय कॉलमध्ये बॅंक कर्जदाराशी संवाद साधणार आहे. फक्त थकीत रक्कम सांगणार नाही तर कधीपर्यंत भरू शकता असं आपुलकीने विचारलं जाणार आहे.
कर्जदाराने कधी थकीत रक्कम भरू हे सांगितल्यावर रक्कम कशी भरणार? याची एआय कॉलवरून होणार आहे.या तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. थकीत कर्जदार अनेकवेळा बॅंकेतून येणारे फोन किंवा वसुली अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरून आलेले कॉल स्वीकारत नाही. एआय कॉलमुळे थकीत कर्जदाराला फोन कुणाचा आहे हे कळत नाही. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदा कर्जवसुलीसाठी एआय कॉलचा वापर केल्यानंतर ग्राहकांनी त्याचे स्वागत केले आहे.

































































