मुद्दा – गुंतवणूक रणनीतीचा फेरआढावा गरजेचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत पिंपळे

कच्च्या तेलाच्या दराने घेतलेली मोठी उसळी, महागाईचा धोका, रुपयाची घसरण आणि मध्यपूर्वेतील युद्ध संकटामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता लक्षात घेता निश्चित उत्पन्न देणाऱया वित्तीय पर्यायात (फिक्स्ड इन्कम) गुंतवणूक करणाऱया व्यक्तींवर आपली संपूर्ण गुंतवणूक रणनीती पुन्हा तपासण्याची वेळ आलेली आहे. सामान्यतः गुंतवणूकदार फिक्स्ड इन्कम मार्पेटमध्ये दोन प्रकारे सहभागी होत असतात. त्यातील पहिला म्हणजे थेट गुंतवणूक. यात ऑनलाइन बाँड प्लॅटफॉर्म्सद्वारे थेट कर्जरोखे खरेदी केले जातात, तर दुसरा प्रकार म्हणजे डेट म्युच्युअल फंड हा आहे. यात म्युच्युअल फंड योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.

कर्जरोखे पर्यायांमधील गुंतवणुकीचा मुख्य उद्देश भांडवल सुरक्षित ठेवणे आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळवणे हे असतात. अनेक ‘ऑनलाइन बॉण्ड प्लॅटफॉर्म्स’ सध्या कमी पतमापन दर्जा असलेले कर्जरोखे विकत आहेत. जर अर्थव्यवस्था मंदावली तर अशा कर्जरोख्यांमधील गुंतवणूक बुडण्याचा धोका अधिक असतो. तसेच जर गुंतवणूकदाराला मुदतीपूर्वी पैसे हवे असतील तर हे रोखे विकणे कठीण होऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता डेट म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीच्या अनेक निकषांवर अधिक सरस ठरतात. अधिक परतावा देणारे, पण जोखमीच्या कर्जरोख्यांच्या (हाय यील्ड बाँड्स) तुलनेत डेट म्युच्युअल फंडांचे चार प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत ः

1) उत्तम तरलता – गुंतवणूकदारांसाठी डेट म्युच्युअल फंड अधिक तरल ठरतात. कारण त्यात कोणत्याही अडचणीशिवाय त्यांना गुंतवणूक परत मिळू शकते. याउलट वैयक्तिक कर्जरोखे विकताना गुंतवणूकदाराला बाजारात योग्य खरेदी-विक्रीची किंमत शोधण्यासाठी खूप धडपड करावी लागते आणि ती अनेकदा खूप मर्यादित असते.

2) गुंतवणुकीत उत्तम वैविध्यता – नियमांनुसार म्युच्युअल फंडांना कर्जरोखे जारी करणाऱया प्रत्येक संस्थेमध्ये गुंतवणुकीची एक ठरावीक मर्यादा पाळावी लागते. त्यामुळे म्युच्युअल फंड आपली गुंतवणूक सरकारी रोखे (जी-सेक), राज्य विकास कर्जरोखे (एसडीएल), सार्वजनिक क्षेत्रातील पंपन्यांचे कर्जरोखे आणि कॉर्पोरेट रोखे अशा विविध ठिकाणी विभागतात.

3) व्यावसायिक पद्धतीने फंड व्यवस्थापन – डेट फंडचे व्यवस्थापन हे नेहमी फंड व्यवस्थापक आणि विश्लेषकांच्या अनुभवी टीमद्वारे केले जाते. ही टीम कर्ज फेडण्याची क्षमता (क्रेडिट रिसर्च) आणि जागतिक व देशांतर्गत अर्थकारण (मॅक्रो इकॉनॉमिक रिसर्च) यांचा सखोल अभ्यास करते. त्यामुळे पोर्टफोलिओमधील व्याजदराची जोखीम आणि पैसे बुडण्याचा धोका नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच विविध संस्था आणि वेगवेगळ्या मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणुकीची विभागणी झाल्यामुळे बाजार कोणत्याही परिस्थितीतून संक्रमण करत असला तरी गुंतवणूक सुरक्षित ठेवणे आणि गरजेनुसार पैसे उपलब्ध करणे सोपे जाते.

4) कार्यक्षम पद्धतीने जोखीम व्यवस्थापन – डेट म्युच्युअल फंड प्रामुख्याने वित्तीय संस्था असल्याने त्यांना जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सरकारी नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे त्यांच्या कामकाजावर सतत देखरेख राहते. या फंडमध्ये तरलता, व्याजदरातील बदल, एकाच ठिकाणी जास्त गुंतवणूक न करणे आणि पैसे बुडण्याचा धोका याकडे सतत लक्ष ठेवले जाते. या सततच्या देखरेखीमुळे कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे होते.

(मुख्य गुंतवणूक अधिकारी (फिक्स्ड इन्कम), बडोदा बीएनपी परिबा अॅसेट मॅनेजमेंट)