
महाराष्ट्राच्या राजकारणात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजत असताना बिहारमध्ये नव्या सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी जादूटोण्याचे प्रयोग सुरू आहेत. येथील 27 आमदारांनी मंत्रीपदासाठी तांत्रिक पूजा, ग्रहदोष निवारण पूजा आणि अनुष्ठान केल्याचे समोर आले आहे.
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये नवे सरकार येणार आहे. या सरकारमध्ये वर्णी लागावी यासाठी आमदार तंत्रमंत्राचा आधार घेत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळावे. ते नाही तर किमान मंत्रीपद मिळावे यासाठी आमदार तांत्रिकांच्या संपका&त आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळे विधी करवून घेत आहेत.
ज्योतिषांचाही दुजोरा
बिहारमधील प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. श्रीपती त्रिपाठी यांनी यास दुजोरा दिला. बिहार आणि झारखंडमधील अनेक राजकीय व्यक्ती माझे शिष्य आहेत. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी ते माझा सल्ला घेतात. राज्यात नवी राजकीय समीकरणे तयार झाल्यामुळे अनेक शिष्य माझ्याकडे आले आहेत. चांगल्या पदांसाठी ते उपाय शोधत आहेत. त्यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळावी म्हणून त्यांच्या पुंडलीचा अभ्यास करून अनुकूल उपाययोजनादेखील मी केल्या आहेत, अशी माहिती त्रिपाठी यांनी एका वृत्तपत्राला दिली. इतरही अनेक ज्योतिषांनी अशा पूजा होत असल्याचे सांगितले.

























































