
दिल्लीहून शिर्डीकडे निघालेले विमानाचे खराब हवामानामुळे सुरतमध्ये इमर्जंसी लँडिंग करण्यात आले. घिरटय़ा घालताना हे विमान नाशिकच्या येवला व वैजापूर तालुक्यातील पूर्व भागातील अतिशय कमी उंचीवर असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर विमानाचे सुरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यांनतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सदाशिव बाणे यांचे निधन
ज्येष्ठ शिवसैनिक आणि गिरगांव येथील रहिवाशी सदाशिव गोविंद बाणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे बारावे आणि तेरावे त्यांच्या गावी राजापूर येथे होणार आहे.
एलईडी दिवे लावून मासेमारी; तीन नौका पकडल्या
मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या गस्तीनौकेकडे डिझेल नसल्याने एलईडी दिवे लावून बिनधास्त समुद्रात मासेमारी सुरू होती. हीच संधी ओळखून मत्स्य व्यवसाय विभागाने तत्काळ डिझेल उपलब्ध करून सोमवारी मध्यरात्री थरारक पाठलाग करून एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱया तीन नौका जयगड येथे पकडल्या आहेत.
मासेमारी सुरू असताना मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकली. त्याचक्षणी मासेमारी करणाऱया नौकांवर समुद्रातून पळ काढला. सुमारे एक तास थरारक पाठलाग करत गस्ती नौकेने ‘आयएनडी-एमएच 4- एमएम 1961 एच. इम्तियाज नौका’, ‘आयएनडी-एमएच 4- एमएम 506 लक्ष्मी’ व ‘आयएनडी-एमएच 4- एमएम 1971 हि अक्सा इम्रान’ या नौकांचा समावेश आहे.
कपडा व्यापाऱ्याच्या घराला आग, पाचजणांचा मृत्यू
गुजरातच्या सुरत शहरात आज दुपारी एका घराला लागलेल्या भीषण आगीमध्ये चार महिलांसह एका मुलाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला.
सुरत शहरातील लिंबायत भागात ही घटना घडली. आग लागली ते घर एका कपडा व्यापाऱयाचे आहे. घरात सुमारे आठ टन साडय़ांचा साठा होता. घरभर साडय़ा ठेवण्यात आल्यामुळे पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. दुपारी अचानक आग लागली आणि संपूर्ण साडय़ा क्षणात भस्मसात झाल्या. साडय़ांमुळे आगीने काही क्षणांत रौद्र रूप धारण केले. त्यामुळे कोणालाच बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. मृतांमध्ये शाहनाज अंसारी (65), हुसा बेगम अंसारी (18), शबीन अंसारी (28), परवनी अंसारी (19) आणि शुभान अंसारी (4) यांचा समावेश आहे.

























































