
शिर्डीतील 55 वर्षीय शेतकरी रावसाहेब गोंडकर यांनी स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या अशोक खरात याच्यावर सुमारे 10 कोटी रुपयांच्या चार एकर जमिनीची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी मंगळवारी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोंडकर यांनी आपल्या तक्रारीत खरातसोबत त्याची पत्नी कल्पना, तसेच किरण सोनवणे, अशोक तांबे आणि अरविंद बावके यांचाही सहभाग असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायदा, 2014 अंतर्गत पाचही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यापैकी किरण सोनवणे आणि अरविंद बावके यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
या नव्या प्रकरणामुळे अशोक खरातविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. त्यापैकी 10 गुन्हे नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद असून, त्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करत आहेत, तर शिर्डीतील या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
तक्रारीनुसार, गोंडकर यांनी 2019 मध्ये शिर्डीतील एका सहकारी पतसंस्थेकडून 15 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र त्याची परतफेड करण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी किरण सोनवणे याच्यासह पुन्हा 1.30 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यासाठी जमिनीचा तारण ठेवण्यात आला. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने गोंडकर आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत ऑगस्ट 2023 मध्ये किरण सोनवणे याने त्यांची ओळख अशोक खरातशी करून दिली. त्या वेळी गोंडकर हे शिर्डीतील सहकारी पतसंस्थेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी 2 टक्के मासिक व्याजदराने कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
गोंडकर यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरात याने कर्ज देण्यास सहमती दर्शवली, मात्र त्यासाठी चार एकर जमिनीचा विक्री करार (sale deed) करण्याची अट घातली. आर्थिक अडचणीमुळे गोंडकर यांनी हा करार मान्य केला आणि संबंधित कागदपत्रांवर सही केली. याचवेळी एक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला, ज्यामध्ये एका वर्षाच्या आत व्याजासह एकूण 6.07 कोटी रुपये परत केल्यास जमीन पुन्हा खरेदी करता येईल, अशी अट नमूद करण्यात आली होती.
त्यानंतर अशोक खरात याने गोंडकर आणि किरण सोनवणे यांचे मिळून 2.05 कोटी रुपयांचे थकीत कर्ज त्या सहकारी पतसंस्थेला फेडले. तसेच जमिनीच्या बदल्यात गोंडकर यांना 3.46 लाख रुपये देण्यात आले. काही महिन्यांनंतर किरण सोनवणे याने गोंडकर यांच्याकडून सही केलेले आठ कोरे धनादेश घेतले आणि त्या धनादेशांच्या माध्यमातून 1.65 कोटी रुपये व्याज म्हणून अशोक खरात याला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहारात अशोक तांबे आणि अरविंद बावके यांनी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
गोंडकर यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2024 पासून ते आपली जमीन परत मिळवण्यासाठी अशोक खरात याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसून, वारंवार भेटण्याचे टाळले जात आहे. त्यांनी नाशिक शहरातील खरातच्या कार्यालयालाही भेट दिली, मात्र ते कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. तसेच खरात आणि सोनवणे दोघेही भेटण्याचे टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेल्या कल्पना खरात हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तिने फोन किंवा संदेशांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. पोलिसांच्या पथकाने तिच्या अटकेसाठी नाशिकमधील निवासस्थानी धाड टाकली, मात्र ती तेथे आढळली नाही. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असल्याची माहिती शिर्डी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

































































