भाजप हुकूमशाहीवर उतरली आहे; गुजरात ‘आप’ अध्यक्षांच्या अटकेवर अरविंद केजरीवाल यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे (AAP) गुजरात प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला असून भाजप आता पूर्णपणे हुकूमशाहीवर उतरली असल्याचा आरोप केला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी इसुदान गढवी यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून अद्याप सविस्तर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांनी केवळ “कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे”, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले आहे.

या अटकेवर प्रतिक्रिया देताना X वर एक पोस्ट करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, “गेल्या तीन महिन्यांत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध १४५ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्या आहेत. १६० हून अधिक कार्यकर्त्यांना भाजप सरकारने अटक केली आहे. गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने भाजप आम आदमी पक्षावर प्रचंड संतापली आहे आणि आता ती हुकूमशाहीवर उतरली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आज आमचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांना अटक करण्यात आली. आता गुजरातचा एक-एक नागरिक यांचा बदला घेईल. भाजपचा हा अहंकार आणि अत्याचार गुजरातची जनताच मोडून काढेल.”