
चंदीगडमधील सेक्टर ३३ मध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर मंगळवारी सायंकाळी भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. एका अज्ञात तरुणाने दुचाकीवरून येत भाजप कार्यालयाला लक्ष्य करून हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) फेकला आणि तो तिथून पसार झाला. या स्फोटामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये एक तरुण दुचाकीवरून कार्यालयासमोर येताना दिसतो. त्याने कार्यालयाच्या दिशेने स्फोटक वस्तू भिरकावली आणि अवघ्या काही सेकंदातच तिथे मोठा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र कार्यालयाच्या परिसरातील काही वस्तूंचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
स्फोटाच्या तीव्रतेमुळे चंदीगडसह शेजारील पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि राजकीय कार्यालयाबाहेर अशा प्रकारे दहशतवादी कृत्य झाल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चंदीगड पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत असून, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर भाजप कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.


























































