
बीसीसीआयने टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची घोषणा केली असून जुलै 2026 मध्ये हिंदुस्थानचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी- 20 सामने खेळणार आहे. या मालिकेत धडाकेबाज युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील पदार्पणाची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे या मालिकेत सूर्यवंशी युगाचा प्रारंभ मानला जात आहे.
या मालिकेतील तिन्ही सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळले जाणार आहेत. पहिला सामना 23 जुलै रोजी होणार असून 25 आणि 26 जुलैला पुढील दोन सामने खेळले जातील. सलग सामने असल्यामुळे संघ संयोजन आणि खेळाडूंची तयारी याची खरी परीक्षा होणार आहे.
ही मालिका केवळ नियमित स्पर्धा नसून हिंदुस्थानच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी ट्वेण्टी-ट्वेण्टी विश्वचषक 2028 आणि ऑलिम्पिक 2028 च्या पार्श्वभूमीवर संघ बांधणी, नव्या खेळाडूंना संधी आणि राखीव ताकदीची चाचणी घेण्यासाठी हा उत्तम टप्पा ठरणार आहे
याच पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चा आहे ती वैभव सूर्यवंशीची. अवघ्या 15 व्या वर्षी या युवा फलंदाजाने आयपीएल आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वेगवान गोलंदाजांवर आक्रमक फटके खेळण्याची त्याची शैली आणि आत्मविश्वास यामुळे तो निवड समितीच्या रडारवर आला आहे. आता तो वयोमर्यादेनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पात्र ठरला असल्याने त्याला या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

























































