
गोवंडी येथे 1981 साली झालेल्या दंगलीत पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात अटक होऊन जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार झालेला तडीपार सराईत गुन्हेगार पोपट वायदंडे (72) अखेर सापडला. ट्रॉम्बे पोलिसांनी त्याला सांगलीत पकडले. गोवंडीत उसळलेल्या दंगलीत पोलिसांवर हल्ला झाला होता. त्यात 61 आरोपी होते. त्यापैकी एक असलेला पोपट वायदंडे याला तेव्हा पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पसार झाला. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोपट हा सांगलीच्या तडसर येथील एका गावात लपून वास्तव्य करत असल्याची खबर ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद नाणेकर तसेच संदीप पाटील, सूरज पवार आणि शोभा काळेल या पथकाने आंबेगाव गाठून पोपट वायदंडे याला पकडले.

























































